ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली. दरम्यान, आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवार, ९ एप्रिल रोजी पोलिस उपायुक्तांची भेट घेत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
हे वाचलंत का? - संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीचा फोन! शिवीगाळ करत म्हणाला, "एक सीट तरी..."
नेमकी घटना काय?
सोमवार, ७ एप्रिल रोजी मुंब्रा येथे एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या मुलीला खेळणी देण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिला त्याच्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर त्यानंतर त्याने तिची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, बुधवारी आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्याशी चर्चा करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. माध्यमांशी बोलताना आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, "आरोपीवर कडक शासन व्हावे जेणेकरून यापुढे अशी कोणतीही घटना घडता कामा नये, अशी आमची मागणी आहे. लोकांना यातून चांगला संदेश गेला पाहिजे. डीसीपींनी आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्याबाबत आश्वस्त केले आहे. तसेच दोषींवर फाशीची कारवाई व्हावी हीदेखील आमची मागणी आहे. यासोबतच याठिकाणी असे अनेक पॉईंट्स आहेत जिथे ड्रग्जसारखे चुकीचे प्रकार चालतात. ही गोष्ट आम्ही पोलिसांच्या निदर्शनात आणून दिली आहे," असेही त्यांनी सांगितले.