मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्या दोन्ही मुलींचे पालकत्व स्विकारण्याची मागणी करण्यात येत आहे.
तनिषा भिसे असे या महिलेचे नाव असून ती आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारासाठी १० लाख रुपये डिपॉझिट भरण्याची मागणी केली. भिसे कुटुंबियांनी अडीच लाख रुपये भरण्याची तयारी दाखवल्यानंतरही त्यांच्यावर उपचार केले नाहीत. त्यानंतर तनिषा भिसे यांनी दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेत त्यांनी दोन मुलींना जन्म दिला. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
हे वाचलंत का?- दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेची नोटीस! तात्काळ थकीत कर भरा, अन्यथा...
या घटनेविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे, आमदार अमित गोरखे यांनी दीनानाथ रुग्णालयाने त्या मुलींचे पालकत्व स्विकारण्याची मागणी केली आहे. "पीडित भिसे कुटुंबातील दोन जुळ्या मुलींना सुरक्षित आणि सुसंस्कृत आयुष्य देणे ही काळाची गरज आहे. या मुलींचे पालकत्व दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने स्वीकारावे, ही माझी विनंती आहे. या पावलातून त्यांच्या भविष्यास आधार मिळेल आणि समाजात एक सकारात्मक संदेश जाईल की, माणुसकी अजूनही जिवंत आहे," अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे.