मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी विस्तृत आराखडा तयार करा. तसेच आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने आरोग्य उपकेंद्रांपासून ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंतच्या संस्थांचे बळकटीकरण ‘मिशन’ मोडमध्ये राबवा, असे निर्देश बुधवार, ९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत मंत्री प्रकाश आबिटकर, आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली, अवयव प्रत्यारोपण संस्था, तसेच विविध जिल्ह्यांतील रुग्णालयांची उभारणी आणि उपकरणे खरेदी यावर चर्चा झाली.
हे वाचलंत का? - दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 'त्या' मुलींचं पालकत्व स्विकारावं! कुणी केली मागणी?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कर्करोग उपचारांसाठी केमोथेरपी, रेडिएशन थेरपीसह एकात्मिक संदर्भ सेवा विकसित केली पाहिजे. त्यासाठी प्रभावी कार्यपद्धती आणि ठराविक कालमर्यादा आवश्यक आहेत. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा. तसेच नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात याव्या," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसोबत संलग्न रुग्णालयांमध्ये वाढती लोकसंख्या आणि रुग्णसंख्येचा विचार करून स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात यावे, असे निर्देश दिले. तसेच धाराशिव येथे नव्याने रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव मांडला. यासोबतच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना काही कालावधीसाठी शासकीय रुग्णालयात सेवा देणे बंधनकारक करण्याबाबतही विचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.