बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात अजून एका वाघाटीचा मृत्यू; 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्रा'तील मृत्यूचे सत्र सुरूच

08 Apr 2025 11:33:07
rusty spotted cat kitten died


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन प्रकल्पा'तील अजून एका वाघाटीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे (rusty spotted cat kitten died). पिल्लू अवस्थेतील या वाघाटीचा अस्थिभंग झाला होता. या मृत्युमुळे राष्ट्रीय उद्यानातील वाघाटीच्या पिल्लांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून आता केंद्रात केवळ तीन वाघाटी शिल्लक राहिल्या आहेत (rusty spotted cat kitten died). त्यामुळे प्रशासन वाघाटी प्रजनन केंद्रातील उपचार पद्धतींविषयी गंभीर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (rusty spotted cat kitten died)


दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी राष्ट्रीय उद्यानातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्रातील सहा पिल्लांचा मृत्यू हा संसर्गजन्य आजाराने आणि एका पिल्लाचा मृत्यू हा उंचावरुन पडून झाल्याचे त्या वृत्तात म्हटले होते. अशातच तीन दिवसांपूर्वी वाघाटीच्या अजून एका पिल्लाचा मृत्यू झाल्याची माहिती उद्यानातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. वाघाटीच्या या पिल्लाला देखील व्हायरल संसर्ग झाला होता. मात्र, त्यामधून बाहेर पडल्यानंतर हे पिल्लू अशक्त झाले होते. दरम्यान त्याला अस्थिभंग देखील झाला होता. अंतर्गत रक्तस्त्राव देखील झाला होता. अशा सगळ्या गुंतागुंतीमुळे या पिल्लाचा मृत्यू झाला.


यापूर्वी झालेल्या वाघाटीच्या पिल्लांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत. उद्यानाच्या संचालक देखील अंतर्गत चौकशी करत आहेत. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम कार्यालयाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अहवाल मागवला आहे. मात्र, अशातच वाघाटीच्या अजून एका पिल्लाला आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन प्रतिनियुक्तीवर सुरू असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेमणूकीचा खेळ खेळणे बंद करुन पूर्ण वेळ निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नेमणार का ?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Powered By Sangraha 9.0