रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने आमदार निवासात एकाचा मृत्यू, पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात नेलं

08 Apr 2025 12:04:52
 
mla vijay deshmukh s activist father death in amdar niwas
 
मुंबई : (Akashwani Amdar Nivas) मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत धोत्रे असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून ते ६१ वर्षांचे होते. त्यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
 
माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत धोत्रे हे न्यायालयीन कामासाठी सोलापूरवरून मुंबईत आले होते. मतदारसंघातील असल्यामुळे ते आमदार विजय देशमुख यांच्या खोली क्रमांक ४०८ मध्ये मुक्कामासाठी थांबले होते. दरम्यान, ७ एप्रिलच्या मध्यरा‍त्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांनी त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेला फोन केला, पण रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. परिणामी आमदार निवासाजवळ असणाऱ्या पोलिसांच्या गाडीतून चंद्रकांत धोत्रे यांना जीटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
 
दरम्यान, चंद्रकांत धोत्रे यांच्या कुटुंबियांकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे कुठलीही पोलिस कारवाई झालेला नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागातून आलेले बरेच कार्यकर्ते हे आमदार निवासात मुक्कामी राहत असतात. त्यामुळे आमदार निवास परिसरात वेळेत रुग्णवाहिका मिळू न शकल्याने अनेक प्रश्न ही उपस्थित केले जात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0