नवी दिल्ली: ( fight at Congress headquarters in Bihar ) काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या बिहार दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा हा दौरा २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला बळकटी देण्याच्या उद्देशाने केला जात आहे. परंतु दौऱ्यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच झालेल्या हाणामारीने काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. बेगुसराय येथे पदयात्रा काढून सत्ताधारी नितीश कुमार यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसतर्फे हा दौरा आखण्यात आला होता. राज्यात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा होता. मात्र, यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनीच आपसात राडेबाजी करून अंतर्गत संघर्ष तीव्र असल्याचे दाखवून दिले आहे.
दौऱ्यादरम्यान राहुल गांधी हे बिहारची राजधानी पाटणा येथील काँग्रेसचे राज्य मुख्यालय असलेल्या सदाकत आश्रमात पोहोचले. येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि राहुल गांधी हे नेते – कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. मात्र, एकीकडे आतमध्ये बैठक सुरू असतानाच बाहेर मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. माजी आमदार अमित कुमार तन्ना आणि काँग्रेसचे राज्यसभा सदस्य अखिलेश प्रसाद सिंह यांच्या अंतर्गत संघर्षातून हा राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वक्फसमर्थक कार्यकर्त्यासही मारहाण
भोजपूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता रामबाबू यादव यांच्याविरुद्धही मारहाणीची घटना घडली आहे. यादव हातात पोस्टर घेऊन सदाकत आश्रमात पोहोचले होते. यामध्ये त्यांनी वक्फ कायद्यासाठी राहुल गांधींकडून पाठिंबा मागितला होता. रामबाबूंनी सांगितले की, पोस्टर दाखवताच काही काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आपण आपला मुद्दा शांततेने मांडण्यासाठी आलो होतो, मात्र आपल्याला मारहाण करण्यात आल्याचे ते म्हणाले.