अमेरिका –चीन व्यापारयुध्द – भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम

आयातशुल्कवाढीने होऊ शकतात नवे व्यापार करार

    08-Apr-2025
Total Views |
china
 
  
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगातील जवळपास ७० देशांवर आयाशुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला व त्यात कुठल्या देशावर किती आयातशुल्क लादले जाणार याची यादी जाहीर केली. या ७० देशांमध्ये भारतासह चीनचाही समावेश होता. भारत आणि चीन या दोन्ही देशांवर अनुक्रमे २६ आणि ५४ इतके आयातशुल्क लादण्यात येणार आहे. हे आयातशुल्क लादले जाताच चीननेही अमेरिकेवर आयातशुल्क लादण्याची घोषणा केली. यामुळे जगात भावी व्यापारयुध्दाची नांदीच झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
चीन – अमेरिकेने एकमेकांवर लावलेल्या आयातशुल्कांना मिळालेल्या प्रतिक्रिया
 
अमेरिकेकडून चीनवर ५४ टक्के आयातशुल्क लादण्यात आले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेवर ३४ टक्के आयातशुल्क लादले. १० एप्रिलपासून चीन कडून लादल्या गेलेल्या आयातशुल्कांची अंमलबजावणी सुरु होईल. चीनच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने जर चीनने आपल्याकडून लादलेले आयातशुल्क मागे घेतले नाही तर चीनवरच्या आयातशुल्कात ५० टक्क्यांची करु अशी धमकी दिली आहे. यासर्वांचा परिणाम म्हणून या दोन्ही देशांत व्यापारयुध्द भडकण्याची शक्यता तयार झाली आहे.
 
 
अमेरिका - चीन द्विपक्षीय व्यापार
 
अमेरिकेला चीनकडून होणारी निर्यात वाढती आहे. त्यामुळे दोन देशांमधील व्यापारी तूटही वर्षागणिक वाढत आहे. २०२४ मध्ये अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील व्यापार हा ५८२. ४ बिलियन डॉलर्स इतका होता. त्यात अमेरिकेची चीनला होणारी निर्यात १४३.५ बिलियन डॉलर्स होती तर चीनकडून अमेरिकेची आयात ही ४३८. ९ बिलियन डॉलर्स इतकी होती. या दोन्ही देशांतील अमेरिकेच्या बाजूने ही व्यापारी तूट तब्बल २९५.४ बिलियन डॉलर्स इतकी आहे. अमेरिकेकडून चीनवर सर्वात जास्त आयातशुल्क लादण्यामागे ही कारणे आहेत.
 
या दोन देशांमधील व्यापार युध्दाचे भारतावर होणारे परिणाम
 
या दोन देशांमधील व्यापारयुध्दाचे परिणाम दोन्ही देशांचा प्रमुख व्यापारी भागीदार असलेल्या भारतावर निश्चितच होणार आहेत. त्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे
 
१) भारतातील स्मार्टफोन, लॅपटॉप, घरगुती उपकरणे महागण्याची शक्यता आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे या उपकरण निर्मितीमध्ये चीनचे असलेले वर्चस्व.
 
२) भारतातील सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक असलेल्या फार्मासिटीक्युल्स क्षेत्राला याचा फटका बसणार आहे. कारण या क्षेत्रातील कच्च्या मालाचा चीन मोठा पुरवठादार देश आहे.
 
३) चीनकडून आयात होणाऱ्या वाहनांचे सुटे भाग महागण्याची शक्यता निर्माण होणार आहे.
 
४) देशातील दागिने निर्मिती क्षेत्रावर देखील याचे परिणाम होणार आहेत. त्यामुळे या क्षेत्राला सजग रहावे लागेल.
 
५) सर्वात शेवटी या सर्वाचा परिपाक म्हणून चीन आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याकडे या देशांचा कल राहील ज्यातून या दोन्ही देशांना, त्यातही भारताला फायदेशीर व्यापार करार होऊ शकतात.