नवी दिल्ली : मुद्रा योजनेने भारतीयांमधील उद्योजकता घडवली आहे. ही योजना सशक्त भारतीय घडवण्याच्या आपल्या प्रयत्नांना साकार करणारी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्वाकांक्षी योजना म्हणून मुद्रा योजना ओळखली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांशी मंगळवारी संवाद साधला. या संवादातून पंतप्रधानांनी मुद्रा योजनेमुळे त्या लाभार्थ्यांच्या आयुष्यात कसा फरक पडला आणि या योजनेमुळे त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत झाली त्याबद्दल जाणून घेतले.
मुद्रा योजना काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे ८ एप्रिल २०१५ रोजी या योजनेची सुरुवात झाली होती. अल्प उत्पन्न गटातील लोकांना पतपुरवठा करुन त्यांच्यात उद्योजकतेचा विकास करणे हे या योजनेचे उद्दीष्ट होते. या योजनेत तीन गटांत कर्ज वितरण केले जाते. पहिला स्तर म्हणजे, शिशु स्तर या गटात ५० हजारांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यानंतर येतो तो किशोर गटात ५० हजार ते ५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळते. त्यानंतर सर्वात शेवटचा गट येतो तो म्हणजे तरुण गट. या गटात ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या योजनेत पात्र होण्यासाठी ती व्यक्ती कॉर्पोरेट क्षेत्रातील, शेतीशी संबंधित क्षेत्रातील किंवा लघु उद्योग क्षेत्रातील नसावी ही अट आहे. अशीच व्यक्ती या योजनेंतर्गत अर्ज करु शकते. या दहा वर्षांच्या काळात ३२.६१ लाख कोटी रुपयांची ५२ कोटी कर्जे वितरित झाली आहेत.
या योजनेतून झालेल्या ठळक गोष्टी
मुद्रा योजनेमुळे आता पर्यंत फक्त वैयक्तिक स्तरावरच नव्हे तर त्यातून अनेक उद्योग देखील उभे राहिलेले आहेत. एकट्या जम्मू आणि काश्मीर राज्यात २०.७ लाख कर्जांचे वितरण झाले आहे. याशिवाय किशोर गटातील कर्जांचे प्रमाण २०१४ पासून सातत्याने वाढत आहे. २०१४ मध्ये असलेले ५.९ टक्के हे प्रमाण २०२५ मध्ये ४४.७ टक्के इथपर्यंत पोहोचले आहे. यावरुनच या योजनेचे यश लक्षात येते.