१० वर्षे स्वावलंबनाची, १० वर्षे आत्मनिर्भरतेची : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

08 Apr 2025 15:03:42
 
Eknath Shinde
 
मुंबई : प्रधानमंत्री मुद्रा योजनेला (PMMY) १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. १० वर्षे स्वावलंबनाची आणि १० वर्षे आत्मनिर्भरतेची अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
 
आपल्या 'एक्स' अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आज ८ एप्रिल २०२५ रोजी, प्रधानमंत्री मुद्रा योजनेला (PMMY) १० वर्षं पूर्ण होत आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशभरात आतापर्यंत तब्बल ५२ कोटींपेक्षा अधिक कर्ज मंजूर करण्यात आली असून एकूण रक्कम ३२.६१ लाख कोटींवर पोहोचली आहे. जागतिक बँकेने गौरवलेल्या या योजनेच्या यशासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनापासून अभिनंदन करतो."
 
हे वाचलंत का? -  'सलोखा' योजनेला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ! काय आहे ही योजना?
 
महाराष्ट्रातून २.७४ लाख कोटींचे योगदान
 
"महाराष्ट्राने या योजनेतून २.७४ लाख कोटींचे कर्ज वितरण केले असून या योजनेमध्ये महाराष्ट्राने खूप मोठे योगदान दिले आहे. या योजनेचा व्याप खूप मोठा असतानाही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत NPA म्हणजेच बुडीत कर्जाचे प्रमाण फक्त ३.६% इतकेच आहे. हेच या योजनेचे मोठे यश आहे," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या मोठ्या संख्येने लोकांना कर्ज हमी देणारी ही योजना जगातील सर्वांत मोठी योजना आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीला मी सलाम करतो. या योजनेमुळे छोट्या उद्योजकांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ मिळाले आहे. मुद्रा योजनेची ही १० वर्षांची वाटचाल ‘स्वावलंबन’ आणि ‘आत्मनिर्भरते’चा मजबूत पाया घालणारी ठरली आहे," अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0