मुंबई : मुलुंड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित नागरी सेवासुविधांच्या कामांना गती द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, ७ एप्रिल रोजी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे मुलुंड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित नागरी सेवा सुविधांबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार मिहीर कोटेचा, मुख्य सचिव यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हे वाचलंत का? - दिव्यांगाच्या रोजगाराकरिता धोरण तयार करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
याप्रसंगी मुलुंड परिसरातील शासकीय जागेवर महसूल भवन आणि न्यायालयीन इमारत उभारणीच्या प्रस्तावावर त्वरित कारवाई करा. तसेच प्रियदर्शनी क्रीडा संकुलाचे नुतनीकरण लवकर पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच मुलुंडमध्ये पर्यटन केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करा, तसेच नाहूर परिसरात रेल्वे टर्मिनल उभारण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावा
मुलुंड पूर्वेतील कचराभूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने आणि गतिमानतेने करा. तालुका क्रीडा संकुल उभारणीला सुरुवात करा. तसेच लोकसंख्या लक्षात घेता पेट्रोल पंपासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.