राष्ट्रविचारी नॅरेटिव्ह सेट होणे आवश्यक : दत्तात्रेय होसबाळे

- ‘विवेक’ प्रकाशित, ‘राष्ट्रोत्थान’ ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न

    08-Apr-2025
Total Views |

Dattatreya Hosabale
 
मुंबई: ( Dattatreya Hosabale ) सध्या नॅरेटिव्ह युग आहे. भारताच्या इतिहास व संस्कृतीविषयी खोटे पसरवणे हे या नॅरेटिव्हच्या माध्यमातून सुरू असते. मात्र हिंदुत्व हे आजही प्रासंगिक आहे. राष्ट्रविचारी नॅरेटिव्ह सेट होणे आवश्यक आहे. आपल्याला ‘राष्ट्र प्रथम विचार करणारी पिढी घडवायची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
 
‘विवेक’ प्रकाशित, ‘राष्ट्रोत्थान’ ग्रंथ प्रकाशन सोहळा सोमवार, दि. ७  एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वा. निको हॉल, वडाळा उद्योग भवन जवळ, वडाळा (प.) येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. उपस्थितांना संबोधत सरकार्यवाह पुढे म्हणाले की, “संघ १०० वर्षे पूर्ण करतोय. संघटना म्हणून निश्चितच ही मोठी गोष्ट असूनसमाजाने त्याचा स्वीकार केला. देशाच्या राष्ट्रीयतेला आपल्याला आत्मसात करायचे आहे. राष्ट्रसर्वोपरि या भावनेने, ‘राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम’ या श्रीगुरुजींनी दिलेल्या मंत्राने कार्य करायचे आहे. भूमी, जन, संस्कृतीपासून राष्ट्र तयार होते. राष्ट्रीयता हाच राष्ट्रधर्म आहे, त्यामुळे राष्ट्रीयता जगायला शिका,” असे आवाहन सरकार्यवाहंनी यावेळी केले.
 
“संघ ही केवळ संघटना नाही, तर ते एक जीवनाच्या प्रत्येक आयामाला स्पर्श करणारे अभियान आहे. ती एक जीवनशैली असून समाज संघटित करणारे अभियान आहे. संघाचे विचार हे भारतभूमीचे विचार आहेत. संघ कधी पुरस्कारांचा विचार करत नाही. समाजाचा विकास आणि समाज संघटित कसा होईल, तो राष्ट्र विचाराने पुढे कसा जाईल, हा विचार करतो. यासाठी पंचपरिवर्तनाची सूत्रे मांडली आहेत,” असे ते म्हणाले.
 
साप्ताहिक ‘विवेक’बद्दल बोलताना सरकार्यवाह म्हणाले की, “पूर्वी पत्रकारिता एक मिशन म्हणून चालायची, आज ते प्रोफेशन झाले आहे. असे असले तरी, आपले मिशन काय आहे, हे विसरता कामा नये. सत्य समाजासमोर मांडणे हेच पत्रकारितेचे मिशन आहे. साप्ताहिक ‘विवेक’ने हे मिशन आपल्या जीवनात एक व्रत म्हणून जोपासले आहे. ते समाचार, विचार आणि प्रचार या तिन्ही गोष्टींचा मेळ घालून कार्य करत आहे.”
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष ‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांनी केले. ते म्हणाले, “संघाच्या प्रारंभापासूनच संघाची वाटचाली ही संघर्षमय होती. आज संघाचा विस्तार झाला असून निरनिराळ्या क्षेत्रात संघाचे कार्य वाढले आहे.” पतंगे यांनी साप्ताहिक ‘विवेक’च्या प्रवासाबद्दल, मधल्या काळात आलेल्या आव्हानांबद्दल सांगितले. ‘विवेक’चे खरे मालक हे आपले वाचक आहेत, असा भाव त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
‘राष्ट्रोत्थान’ ग्रंथाचे संपादक रवींद्र गोळे यावेळी म्हणाले, “साप्ताहिक ‘विवेक’ आपल्या विचारधारेला आवश्यक आणि पूरक अशी पुस्तके, ग्रंथ प्रकाशित करत असतो. ‘राष्ट्रोत्थान’ हा ग्रंथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचपरिवर्तनाच्या सूत्राला धरून तयार करण्यात आला आहे. ही पाचही सूत्रे चिरंतर जीवन पद्धतीतील सूत्रे आहेत. समाजातील सज्जन शक्तीला पंचसूत्राशी जोडून राष्ट्रविकास व्हावा, म्हणून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली. ही सूत्रे केवळ चर्चेचा विषय नाहीत, तर जगण्याचा विषय आहे. ’मी आणि आम्ही’ यातला फरक काय, हे ग्रंथ वाचल्यावर कळेल. आपण भारतमातेचे पुत्र आहोत, हा भाव जगावा म्हणून हा ग्रंथ प्रकाशित होत आहे.”
 
कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर ‘स्कॉन इन्फ्रा’चे उमेश भुजबळ, ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष ‘पद्मश्री’ रमेश पतंगे, ‘राष्ट्रोत्थान’ ग्रंथाचे संपादक रवींद्र गोळे, साप्ताहिक ‘विवेक’चे कार्यकारी प्रमुख आणि ‘भारतीय विचार दर्शन’चे कार्यवाह राहुल पाठारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी जोशी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
 
व्यक्ती समाजाचा अविभाज्य घटक
 
व्यक्ती हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे सुख, सन्मान सर्वांना मिळायला हवा. समाज उत्थानाचा विचार करणार्‍यांनी याबाबत विचार करणे महत्त्वाचे आहे. स्मशान, पाणी, मंदिर सर्वांसाठी एकसमान आहे, त्यात कुठेही भेदभाव असू नये. काही ठिकाणी विषमता आजही दिसून येते. सामाजिक समरसतेच्या माध्यमातून समाजातील प्रतिबद्धतेला सुदृढ करायलाच हवे, असे मत सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केले.