राजगुरुनगरमध्ये भूमाफियाकडून शेतकऱ्यांची फसवणूक! एसआयटी स्थापन करणार; मंत्री बावनकुळेंचे आश्वासन
08-Apr-2025
Total Views |
मुंबई : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमाफीयांकडून होत असलेल्या फसवणूकीप्रकरणी मुख्यमंत्र्याशी चर्चा करून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करू, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, ८ एप्रिल रोजी दिली.
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफियांकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीबाबत शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी, पोलीस अधिक्षक शिवाजी पवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, पोलीस अधिकारी अमोल मांडवे, महसूल विभागाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
पोपट घनवट यांनी विविध नावांखाली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावांवर राज्यातील विविध ठिकाणी कृषी, निवासी आणि औद्योगिक प्रकारच्या जमिनी खरेदी केल्या आहेत. विशेषत: राजगुरुनगर तालुक्यातील पाईट गावासह अन्य भागांमध्ये त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यानंतर शेतकऱ्यांविरुद्धच तक्रारी दाखल केल्याचे निदर्शनास आले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या बैठकीत भूमाफियांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. तसेच याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याचीही मागणी केली.
सखोल चौकशीची आवश्यकता
दरम्यान, "पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत घनवट यांच्या नावे असलेल्या जमिनींची प्राथमिक चौकशी केली आहे. परंतू, त्यांच्या मालकीच्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून राज्यभरातील घनवट यांच्या जमिनींची आणि त्यासंबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी आवश्यक आहे," असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.