रॉयल्टी बुडवणाऱ्या ठेकेदारांना दणका! गुन्हे दाखल करण्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

    08-Apr-2025
Total Views |
 
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : रॉयल्टी बुडवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून याप्रकरणी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करा, असे आदेश महसूल मंत्री बावनकुळे यांनी सोमवार, ७ एप्रिल रोजी दिले.
 
ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये भुयारी गटार योजनेच्या ठेकेदारांनी मातीची बेकायदेशीर वाहतूक करून रॉयल्टी बुडवल्याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याअनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. किसन कथोरे, आ. प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  मुलुंडमधील नागरी प्रकल्पांना गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
 
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रॉयल्टी बुडवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात झालेल्या दिरंगाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. सन २०१८ पासून शासकीय अधिकाऱ्यांना या विषयाची माहिती असतानाही कारवाईसाठी विलंब का झाला? असा सवाल करत महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक आणि गतिमान कामकाज करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित ठेकेदारांकडून तातडीने दंडाची रक्कम वसुल करा. शासनाची फसवणूक करणाऱ्या कोणाचीही हयगय करणार नाही, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बजावले.
  
नेमके प्रकरण काय?
 
ठाणे महानगरपालिका हद्दीतील भुयारी गटार योजनेसाठी नेमलेले कंत्राटदार आनंद कंस्ट्रवेल यांनी मातीचे उत्खनन करून पुन्हा भरणी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या मातीची रॉयल्टी न भरता तसेच परवानगी न घेता मातीची बेकायदेशीर वाहतूक केली होती. या ठेकेदाराने सुमारे ४ हजार ६५२ ब्रास मातीच्या वाहतुकीपोटी ४ कोटी ८३ लाख ८० हजार ८०० रुपये स्वामीत्व धन (रॉयल्टी) बुडविल्याचेही निदर्शनास आले होते. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका हद्दीतील मौजे कोपरीगाव येथे ठेकेदार मे.एन.सी.सी. आणि एस.एम.सी. यांनी बांधकाम करण्यासाठी मातीचा भराव केला असून हजारो ब्रास स्वामित्व धन (रॉयल्टी) बुडविली आहे. याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.