गुन्हा रद्द करण्याच्या कुणाल कामराच्या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी

07 Apr 2025 13:06:47

urgent hearing kunal kamra
 
मुंबई : (Kunal Kamra) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शोदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून केलेल्या टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याच प्रकरणी शनिवारी ५ एप्रिल रोजी त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याच्याविरुद्ध केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. त्याच्या याचिकेवर मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी तातडीची सुनावणी होणार आहे. मात्र, अंतरिम संरक्षणासाठी कामरा याने संबंधित एकलपीठाकडे दाद मागावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
 
कुणाल कामरा याची याचिका वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी न्या. सारंग कोतवाल आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे सादर केली. तसेच, त्याच्या जीवाला धोका असल्याने त्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही केली. कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाने याच कारणास्तव अंतरिम संरक्षण दिले आहे. त्यामुळे, आम्ही अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करत नसल्याचेही कामरा याच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर, कामरा याच्या जीवाला धोका आहे या तुम्ही दिलेल्या कारणास्तव आम्ही त्याच्या गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊ. परंतु, अंतरिम संरक्षणासाठी तुम्ही संबंधित एकलपीठाकडे दाद मागावी. आम्ही हा मुद्दा अजिबात ऐकणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, कामरा याच्या गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी ठेवली.
 
आपल्यावरील कारवाई ही संविधानाच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, कोणताही व्यवसाय करण्याच्या, जगण्याच्या तसेच वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा कामरा याने याचिकेत केला आहे. कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि मद्रास उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करत ७ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, कामरा याने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0