"डॉ. घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा", भिसे कुटुंबियांचं रुपाली चाकणकरांना पत्र

    07-Apr-2025   
Total Views |

tanisha bhise death case updates bhise family
 
पुणे : (Tanisha Bhise Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे. भिसे कुटुंबाकडून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सोशल मीडियावर आमच्यासंदर्भात चुकीची माहिती पोस्ट केल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबाकडून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दिले आहे. या पत्रात डॉ. घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा आरोप भिसे कुटुंबीयांनी केला आहे. तसेच डॉ. घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील नातेवाईकांनी या पत्रातून केली आहे.
 
खाजगी बाब जगजाहीर करत आमची बदनामी 
 
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अंतर्गत समितीचा चौकशी अहवाल जाणूनबुजून माध्यमांसमोर आणत आमची आणि मृत महिलेची बदनामी केली. रुग्णालयाने खाजगी बाब अहवालातून जगजाहीर करत आमची बदनामी केल्याप्रकरणी रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी देखील भिसे कुटुंबीयांनी रुपाली चाकणकर यांच्याकडे केली आहे. चाकणकर यांनी भिसे कुटुंबीयांचे पत्र स्वीकारले असून सविस्तर माहिती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असे, आश्वासन भिसे कुटुंबाना दिले आहे.
 
रुग्णाच्या गोपनीय गोष्टी जाहीर केल्या, हे अत्यंत चुकीचं 
 
रुपाली चाकणकर पुढे बोलताना म्हणाल्या, "रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेली चर्चा ही गोपनीय असते पण रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी अहवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला आहे. आणि त्यामध्ये रुग्णाच्या बऱ्याच गोपनीय गोष्टी जाहीर केल्या आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. रुग्णालयाने ज्या गोष्टी समिती समोर मांडायला हव्या होत्या, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या, रुग्णालयाला मी कडक समज देईन, असं म्हणत त्यांनी भिसे कुटुंबाला आश्वस्त केले आहे.
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\