चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूर मंदिर प्रशासन सज्ज

07 Apr 2025 13:19:28

pandharpur mandir administration ready for chaitra ekadashi celebrations
 
पंढरपूर : (Pandharpur Chaitri Yatra) वारकरी संप्रदायातील महत्त्वाची यात्रा म्हणजे पंढरपूरची चैत्री यात्रा. या चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक दरवर्षी न चुकता पंढरपूरला येतात. यंदाही या यात्रेला जवळपास चार ते पाच लाख भाविक येतील असा अंदाज प्रशासनाचा आहे. याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिर प्रशासन आता सज्ज झाले आहे.
 
चैत्री यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोईसुविधा मंदिर समिती तर्फे देण्याचे नियोजन केले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची तयारी पूर्ण झाली आहे. वाढत्या उन्हाचा त्रास दर्शन रांगेतील भाविकांना होऊ नये म्हणून पत्रा शेड, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, पंखा आदी सुविधा देणार आहे. आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिका यांच्याकडील रेस्क्यू व्हॅन, प्रशिक्षित कर्मचाऱ्यासह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक १०० सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाइल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलिसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे.
 
दर्शनाला येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. पदस्पर्श दर्शन रांगेत मॅट, बसण्याची सुविधा, थंड पिण्याचे पाणी, तात्पुरते उड्डाणपूल, शौचालये, विश्रांती कक्ष, बाथरूम, थेट दर्शन इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच वाढती उन्हाची दाहकता लक्षात घेऊन पत्राशेडमध्ये कुलर व फॅन बसविण्यात येत आहेत. याशिवाय, महिला भाविकांच्या सोयीसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0