रुग्णांमध्ये देव पाहणारा ‘आरोग्यदूत’

    07-Apr-2025
Total Views |
 
 minister girish mahajan
 
( minister girish mahajan ) आरोग्यदूत ना. गिरीष महाजन हे एक समाजशील आणि लोकाभिमुख राजकीय नेते. ते सत्तेत असोत अथवा विरोधी बाकांवर, शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ गोरगरीब रुग्णांना व्हावा आणि वैद्यकीय सेवासुविधांच्या साहाय्याने व्यापक जनसंख्येचे जीवितरक्षण व्हावे, अशी त्यांची तळमळ राहिली आहे. सन 2004 पासून त्यांनी आरोग्यसेवेची चळवळ सुरू केली. नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्रिपद सोपविण्यात आले. आपल्याकडे चालून आलेल्या संधीचे सोने करीत त्यांनी जनआरोग्य चळवळीशी विविध शासकीय योजनांना जोडून घेऊन गती दिली. ‘महाअवयवदान अभियान’, ‘दिव्यांग सहाय्यभूत योजना’, ‘स्तन कर्करोग जनजागृती अभियान’, ‘लठ्ठपणा जनजागृती अभियान’, ‘कुपोषण सर्वेक्षण व निर्मूलन अभियान’, ‘स्वच्छ मुख (मौखिक आरोग्य अभियान)’, ‘मधुमेहमुक्त महाराष्ट्र अभियान’, ‘मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियान’ अशा प्रकारच्या अनेक नावीन्यपूर्ण व कल्पक योजना राबविल्या व यांपैकी प्रत्येक अभियानाचे काम उत्तमरितीने चालेल, याकडे स्वतः जातीने लक्ष दिले. अल्पावधीतच त्यांच्या कार्यकुशलतेने सदर अभियानाच्या उद्दिष्टांअनुरूप भरीव परिणाम दिसून आले. त्याविषयीचा आढावा...
 
ज्याच्या खेड्यापाड्यातून, दुर्गम भागांतून भेडसावणार्‍या आरोग्यविषयक बाबींचा, त्या भागांतील विविध प्रकारच्या असाध्य आजारांचा, वैद्यकीय उपचारांच्या कमतरतेचा प्रश्न संवेदनशील मनाला स्वस्थ बसू देत नाही. मग आरोग्यसेवेला वाहून घेतलेले, तरल जाणिवांचे ना. गिरीष महाजन कसे बरे स्वस्थ बसतील? अहोरात्र रुग्णसेवेच्या विचारात असलेल्या गिरीष महाजन यांनी सन 2004 पासून आरोग्यसेवा चळवळीचा महायज्ञ चेतविला. तेव्हापासून संवेदनशीलतेच्या साजूक तुपाची आणि अपरिमित श्रमांच्या समिधांची आहुती या यज्ञात अव्याहत सुरू आहे.
 
हा कर्मयोगी आज राजयोगी झाला, तरी घेतला वसा कधी विसरत नाही. आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजसेवेच्या ध्येयाने पछाडलेला हा रयतेचा राजदूत, केवळ रुग्णांची व्यवस्था पाहातो असे नाही, तर रुग्णांसह येणार्‍या आप्तेष्टांनाही आपुलकीचा प्रत्यय देतो. त्यांच्या न्याहारीची, भोजनाची, निवासाची सर्व जबाबदारी स्वतः उचलतो. रुग्णांची विचारपूस करण्यासाठी स्वतः नियमित उपस्थित असतो, औषधोपचारानंतर रुग्णांचा निम्मा आजार महाजनांच्या शब्द स्पर्शांनीच बरा होतो.
 
गिरीष महाजन यांच्या या अलौकिक कार्याचे देदीप्यमान जे यश आज दिसत आहे, त्याला कारण त्यांची ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी अथक श्रम करण्याची वृत्ती, हे असले तरी आणखीही काही अंगीभूत आणि देवदत्त गुण त्यांना लाभले आहेत, ते म्हणजे दूरदृष्टी, संघटनशक्ती आणि नियोजन करण्याची क्षमता. शिबिरांमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी पाऊल टाकण्याअगोदर जागेची पाहणी करून, सर्वस्वी अडथळाविरहित जागा निश्चित करून, मुरमाड भूमीची मशागत करून, डॉक्टर्स, परिचारिका यांची दालने तयार करून, रुग्णतपासणी कक्ष उभारून, बसण्यासाठी खुर्चा, उपकरणांची मांडणी करून अगदी सगळी जय्यत तयारी झालेली असते.
 
शिबिराला प्रारंभी नावनोंदणी करून रुग्णांने आत पाठवले जाते. त्याच्या आजारानुसार त्याला संबंधित डॉक्टरांकडे नेले जाते. तपासणी झाली की, आवश्यकतेनुसार औषधपाणी, शस्त्रक्रिया वगैरे प्रक्रिया पार पडतात. रुग्णांना मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवक नेमलेले असतात. त्यांच्या मदतीमुळे अतिशय सुलभतेने शिबिराचे आयोजन, कार्यान्वयन व समापन होते. शिबीर समापनानंतर उर्वरित औषधे व्यवस्थित एकत्रित करून पुढील अभियानासाठी जतन केली जातात.
 
‘उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी’ असे म्हणतात, ते मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन या उद्योगी माणसाच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे. त्यांचे उपक्रम लक्षात घेऊन, अनेक सेवाभावी संस्थांनी आजवर मदतीचा हात पुढे केला आहे. देणग्यांचा ओघ अव्याहत सुरू झाला आहे. झुळझुळ वाहणार्‍या झर्‍याप्रमाणे सुरु झालेल्या रुग्णसेवेच्या प्रवाहाला विविध सेवाभावी संस्थारुपी सरिता येऊन मिळाल्या आणि आज त्याचं प्रवाहात रूपांतर सागर सदृश्य झालं आहे.
 
फाऊंडेशनचे काम विविध पातळ्यांवर चालते. त्यातील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे, महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये होणारी महाआरोग्य शिबिरे. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती आणि लाभ समाजाच्या निम्न स्तरातील उपेक्षित वर्गापर्यंत पोहोचवण्याचे काम ही शिबिरे करतातच, पण त्याचबरोबर रक्तदान, अवयवदान, कुपोषण, मोतीबिंदू, स्तनांचा कर्करोग यांसारख्या विषयांवर जनजागृती या महाआरोग्य शिबिरांमधून होत असते. किमान तीन दिवस चालणारे हे शिबीर आयोजित करण्यासाठी लागणारे नियोजन, आखणी, खर्च, हे सगळे या शिबिराच्या नावाप्रमाणे ’महा’ या दर्जाचे असल्याने ते आयोजित करण्यापूर्वी अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. त्यामध्ये शिबीर ज्या शहरात घ्यायचे, त्या परिसराच्या आरोग्यविषयक गरजा, तेथील आरोग्याचे प्रश्न यांसह स्थानिक पुढाकार, सहकार्य यासाठी प्रयत्न करावे लागतात.
 
‘सामान्य नागरिकांचे आरोग्य प्रश्न’ हा या शिबिराचा केंद्रबिंदू असल्याने, पक्षीय भेद विसरून या कामात सगळ्या गावाने सहभागी व्हावे, अशी अपेक्षा असते आणि यादृष्टीने प्रचार-प्रसार केला जातो. या शिबिरात त्या जिल्ह्यातील सगळे शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था या सगळ्या वर्गांचा सहभाग मिळावा, म्हणून आवर्जून प्रयत्न होतात. कारण, आधी म्हटल्याप्रमाणे हा समाजाच्या आरोग्याचा शोध असतो. ज्या शहरात हे शिबीर आयोजित केले जाते, त्या परिसरातील पाडे, छोटी गावे, खेडी, आदिवासी भाग या सर्वांना याचा लाभ व्हावा, अशी याची आखणी असते.
 
या शिबिरांचे सर्वांत वाखाणण्याजोगे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या तज्ज्ञ अनुभवी डॉक्टरांची भेट मिळवण्यासाठी एरवी रुग्णांना काही दिवस किंवा कदाचित महिनेसुद्धा वाट बघावी लागते, असे नामवंत डॉक्टर्स या शिबिरात तपासणी आणि निदान करण्यासाठी उपलब्ध असतात. या उपक्रमात अशा डॉक्टर वर्गाचा सहभाग मिळणे, ही या उपक्रमाच्या यशाची पावतीच म्हणावी लागेल. इथे सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. तसेच आवश्यक ती औषधे विनामूल्य दिली जातात आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारांची दिशा, दिवस आणि ठिकाणही निश्चित केले जाते. तपासणी, निदानासोबत येणार्‍या प्रत्येकाची जेवणाखाण्याची काळजी इथे आवर्जून घेतली जाते. या संकल्पनेला आजवर मिळालेला प्रतिसाद बघता, एक जनआरोग्य चळवळच महाराष्ट्रात रुजली आहे, रुजते आहे असे म्हणायला हरकत नाही.
 
आरोग्याचे प्रश्न हे विविध प्रकारचे आणि काहीवेळा तितकेच आव्हानात्मकही असतात. हे लक्षात घेऊन स्थायी स्वरुपाची आरोग्यसेवा आणि विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे अशा दोन पातळ्यांवर आरोग्यसेवा देण्याचे काम फाऊंडेशनतर्फे केले जाते. काहीवेळा तातडीने निदान आणि उपचार आवश्यक असतात. अशावेळी मदत देण्यासाठी फाऊंडेशनने पाच ठिकाणी स्थायी आरोग्य केंद्र उभी केलेली आहेत. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार आणि मुंबई येथे कार्यरत असलेली ही केंद्रे गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत आहेत. या केंद्रांवर सर्व आरोग्य समस्यांचे निदान आणि उपचार दिले जातात.
 
याच्या बरोबरीने राज्यात शहर आणि तालुका पातळीवर आरोग्य शिबिरे आयोजित करून लोकांचे आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. या शिबिरांचा लाभ किती रुग्णांनी घेतला, याबाबतचे तपशील आणि आकडेवारी नक्की बोलकी आहे. या कामामुळे लोकांचा जो विश्वास या फाऊंडेशनने मिळवला आहे, त्याचे प्रतिबिंब महाआरोग्य शिबिरांत दिसते. या शिबीरस्थळी जे वातावरण दिसते, त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात, अशी दाद खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, ती महत्त्वाची आहे.
 
शासकीय योजनांबद्दल सामान्य नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम या उपक्रमातून नक्की होते आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील अनेक नामवंत ट्रस्ट, विविध मंदिरांचे ट्रस्ट हे या कामाच्या मागे ठामपणे अर्थसाहाय्य करण्यासाठी उभे आहेत. या फाऊंडेशनतर्फे केवळ आरोग्य समस्यांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होत नाही, तर विविध अवयव प्रत्यारोपण, गरजू मुलांना ‘कोक्लीयर इम्प्लांट’ बसवून त्यांच्या श्रवण कमतरतेवर मात करणे, दातांचे उपचार, प्लास्टिक सर्जरी, अंध आणि वृद्धांना काठ्या वाटप आणि मानसिक विकार अशा आरोग्याच्या परिघावर असलेल्या अन्य महत्वाच्या समस्यांसाठीही मदतीचा हात दिला आहे.
 
महाआरोग्य शिबिरे
 
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील रुग्णांच्या विविध समस्या आणि आजार, स्थानिक पातळीवर अपेक्षित वैद्यकीय उपचार सुविधांचा अभाव आणि उपचारांकरिता आर्थिक तरतुदीची समस्या यांचा विचार करून कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन यांनी जळगाव, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबार येथे पाच स्थायी आरोग्य केंद्रे सुरू केली. या स्थायी आरोग्य केंद्रांद्वारे पुरविल्या जाणार्‍या आरोग्यसेवा या समाजासाठी काम करणार्‍या प्रत्येकासाठीच अत्यंत प्रेरणादायी आहेत. परंतु, गरजू लोकसंख्येचा विचार करता, या सेवादेखील अपुर्‍या पडताना दिसतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, ग्रामीण भागातील रुग्णांना शहरांतील रुग्णालयांत दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा उपक्रम गिरीष महाजन यांच्यामार्फत सुरू असतानाच, मोठ्या शहरातील नामांकित डॉक्टरांना जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी नेऊन, आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सामूहिक रुग्ण तपासणी, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया सुद्धा करता याव्यात, या उद्देशाने जनआरोग्य चळवळीचे पुढचे पाऊल म्हणून महाआरोग्य शिबिरांची संकल्पना पुढे आली. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकसहभागाद्वारे राज्यभर शहरी, ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागांतही मोठमोठ्या शहरांतील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी, मोफत औषध वितरण, उपचार, शस्त्रक्रिया इत्यादी सेवांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता करण्यात आली. यवतमाळ, सोलापूर, पालघर, उस्मानाबाद, नांदेड, धुळे, पुणे, अहमदनगर, बीड, नंदुरबार, सातारा, चंद्रपूर, अकोला, नागपूर अशा विविध शहरांतून जिल्हा, तालुका पातळीवर व्यापक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
 
 
निरपेक्ष संघ स्वयंसेवक
 
यात विशेष उल्लेख करावा लागेल तो आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांचा. एक रुग्ण म्हणून उपचार घेण्यासाठी ते आधी फाऊंडेशनकडे आले. त्यांचा आजार गंभीर होता. मुंबईत उपचार घेणे गरजेचे होते. या काळात गिरीष महाजन यांनी त्यांची ज्या आस्थेने काळजी घेतली, त्यांना मदत मिळवून दिली, तो अनुभव नाईक यांना केवळ जीवनदान नाही, तर नवी दृष्टी देणारा होता. रुग्णांची आजारपणात झालेली नाजूक भावनिक स्थिती, त्यांना असलेली आधाराची गरज, हे त्यांना प्रकर्षाने जाणवले आणि मग त्यांनी त्यांचे आजारपण संपल्यावर या कामाला पूर्णपणे वाहून दिले. आज ते या फाऊंडेशनच्या सगळ्या प्रकल्पांचा एक मोठा आधार आहेत. फाऊंडेशनचे काम महाराष्ट्र राज्याच्या बाहेरही अन्य राज्यांमध्ये वेगाने वाढते आहे. कारण, ती सगळ्या कसोट्या पार करून सिद्ध झालेली जनचळवळ झालेली आहे. एका निरपेक्ष संघ स्वयंसेवकाने सुरु केलेला एक छोटा उपक्रम आता विशाल रूप घेत आहे. या वटवृक्षाखाली अनेक गरजू पांथस्थ आश्वस्त जीवन जगत आहेत.
 
 
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा
 
’रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद अंगीकारून नि:स्वार्थपणाने, अनन्य भावाने आणि समर्पित वृत्तीने निरंतरपणे या कार्यास जीवन वाहून घेतलेले ’जनआरोग्य चळवळीचे प्रवर्तक’ हीच मा. ना. श्री. गिरीषभाऊंची ओळख होऊन गेली आहे. 1995 पासून सलग त्यांनी जामनेर मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. केवळ जामनेर मतदारसंघाचे किंवा जळगाव जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे ’आरोग्यदूत’ आणि ‘आरोग्यासाठी सर्वाधिक खर्च करणारा आमदार’ अशी त्यांची प्रतिमा झाली आहे. गिरीषभाऊ सत्तेमध्ये सहभागी असोत किंवा विरोधी बाकांवर असोत, सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांची सेवा करणे, त्यांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, पैशांमुळे व उपचाराअभावी कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये, यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणे हाच त्यांचा निरंतर ध्यास आहे, हीच त्यांची आस आहे. हेच त्यांचे कार्य आणि हाच त्यांचा खरा परिचय आहे! विधिमंडळामध्ये काम करणार्‍या प्रत्येक सदस्याला त्यांच्या सेवाकार्याची सर्वांगीण माहिती असून, या क्षेत्रातील त्यांचा अनुभव, अधिकार, दक्षमता आणि प्रभावाची कल्पना आहे. म्हणूनच कोणाही आमदारापासून मंत्र्यांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपासून कार्यकत्यांपर्यंत, सत्ताधार्‍यांपासून विरोधकांपर्यंत कोणापुढेही एखादी आरोग्यविषयक समस्या असेल किंवा तातडीची वैद्यकीय मदत हवी असेल, तेव्हा प्रत्येक जण फक्त गिरीष महाजन यांच्याशी प्रथम संपर्क साधतो. पक्ष, विचार आणि मतभेद यांच्यापल्याड जाऊन ते प्रत्येकाला आपलेपणाने व नि:स्वार्थ भावनेने सदैव सहकार्य करतात.
 
मुंबईत उपचारांसाठी स्वतंत्र यंत्रणा
 
फाऊंडेशनचा आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे, उपचारांसाठी मुंबईत येणार्‍या रुग्णांना दिली जाणारी मदत. मुंबईसारख्या महानगरात उपचारांसाठी येणारे कुटुंब आणि रुग्ण आधीच कमालीचे खचलेले असते. त्यात ज्यांची निवासाची कोणतीही सोय या शहरात नाही, त्यांना ती समस्या भेडसावत असते. रुग्णांसह आलेले आप्त हे निवास, भोजन, रुग्णालयात प्रवेश मिळावा, यासाठी करावी लागणारी धावपळ अशा अनेक प्रश्नांमुळे भांबावलेला असतो, हे लक्षात घेऊन त्यासाठी लागणारी सगळी मदत यंत्रणा फाऊंडेशनतर्फे उभी करण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या कार्यालयात आलेल्या रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणे, योग्य उपचार मिळावे, यासाठी मदत करणे आणि रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी निवास आणि भोजन व्यवस्था, तीही विनामूल्य करण्याचे अतिशय दुर्मीळ काम गेल्या 15 वर्षांपासून केले जात आहे. प्रामुख्याने कॅन्सर रुग्ण, अपघातासाठी उपचार घेत असलेले, कोणतेही गंभीर आणि गुंतागुंतीचे उपचार किंवा अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी आलेले रुग्ण यांना या व्यवस्थेमुळे जो आधार मिळतो, त्याचे वर्णन करणे अशक्य आहे!
 
(शब्दांकन : रामेश्वर नाईक, डॉ. स्वानंद सोनार)