शेअर बाजारात भूकंप, गुंतवणुकदारांचे १४ लाख कोटी पाण्यात

07 Apr 2025 18:32:05
मीोे
 
मुंबई : अमेरिकेकडून लादल्या गेलेल्या आयातशुल्कामुळे भारतासह जवळपास सर्वच आशियाई बाजारांना जोरदार दणका बसला आहे. भारतीय शेअर बाजाराने तर सोमवारी भूकंप अनुभवला. तब्बल २२२६ अंशांनी शेअर बाजार पडत, सेन्सेक्सने ७३,१३७ अंशांची पातळी गाठली. निफ्टीमध्येही जोरदार फटका बसला असून ७४२ अंशांनी तो निर्देशांक घसरला. सोमवारी शेअर बाजार उघडल्यापासूनच घसरण चालू होती. एकवेळ शेअर बाजारातील पडझड ३ हजार अंशांपर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली होती, मध्यल्या सत्रांमध्ये परत खरेदीने जोर पकडल्यामुळे शेअर बाजार काहीसा सावरला.
 
या घसरणीचा सर्वात मोठा फटका बसला तो टाटा स्टील या कंपनीच्या शेअर्सना. टाटा स्टीलचे शेअर्स तब्बल ७.१६ अंशांनी गडगडले. अमेरिकेच्या आयातशुल्क लादण्याने जागतिक बाजारालाही जोरदार धडकी भरवली आहे. आशियातील सर्वच प्रमुख शेअर बाजारांपैकी शांघाय शेअर बाजार ७.३४ टक्क्यांनी पडला, मलेशियातील शेअर बाजार ४.०१ टक्क्यांनी, तर तैवान शेअर बाजार ९.७ टक्क्यांनी पडला. सर्वत्रच जोरदार पडझड दिसून आली.
 
क्षेत्रवार बघितलं शेअर बाजारात आयटी, बँकिंग क्षेत्र, वाहन क्षेत्र, आर्थिक सेवा या सर्वच क्षेत्रांमध्ये जोरदार पडझड झाली. टाटा स्टीलसोबतच, टाटा मोटर्स, कोटक बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे शेअर्स जोरात आपटले. एकूणच शेअर बाजारात सर्वच क्षेत्रांत घसरण दिसून आली. शेअर बाजारात पसरलेली घबराटीने गुंतवणुकदारांचे १४ लाख कोटी पाण्यात गेले.
 
शेअर बाजारातील ही घसरण अभूतपूर्व अशाच प्रकारची म्हणावी लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेकडून लादण्यात आलेले आयातशुल्क त्याचबरोबर शुल्क लादलेल्या देशांकडून त्याला मिळत असलेले प्रत्युत्तर यावरुन जगभर व्यापारयुध्दाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पदन क्षेत्रातील मंदावलेली वाढ, ही कदाचित भविष्यातील मंदीच्या लाटेची नांदी असू शकते असेही शेअर बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
Powered By Sangraha 9.0