( Maryada Purushottam Shriram ) सूर्यवंशात दिलीप नावाचा प्रसिद्ध राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव सुदक्षिणा. त्यांचा पुत्र रघु ज्याने ९९ अश्वमेध यज्ञ केलेत. शंभराव्या वेळी इंद्राने प्रसन्न होऊन घोड्याशिवाय यज्ञ पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला आणि तेंव्हापासून चक्रवर्ती साम्राज्याच्या या वंशाला रघुवंश म्हणतात. रघुचा पुत्र अज ज्याने विदर्भ देशाचा राजा भोज याच्या इंदुमती नावाच्या कन्येशी विवाह केला. याच अज आणि इंदुमतीचा पुत्र म्हणजे राजा दशरथ. दशरथाला तीन राण्या होत्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी पण तिघींनाही पुत्र नव्हता. दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि फलस्वरूप कौसल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न आणि कैकयीला भरत असे चार पुत्र झाले.
श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला अभिजीत मुहूर्तावर झाला. बाल्यावस्थेत त्यांनी माता कौसल्येला अखंड अद्भुत रूप दाखवले होते. हा एक प्रसंग सोडला तर त्यांचे बालपण तत्कालीन इतर सर्व राजपुत्रांप्रमाणेच होते. तरुणपणी विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणार्थ त्यांनी त्राटिका, मारीच इत्यादी राक्षसांचा संहार करून दशरथाचा जेष्ठ पुत्र या नात्याने उत्तराधिकारी म्हणून वाटचाल सुरु केली. पुढे विश्वामित्रांच्याच आशीर्वादाने श्रीरामांनी प्रचंड दुर्धर अशा शिवधनुष्याला प्रत्यंचा लावून जनकाचा सीता-स्वयंवराचा पण जिंकला व सीतेशी विवाह करून ते अयोध्येत परतले आणि दशरथाने खुश होऊन त्यांच्या राज्याभिषेकाची घोषणा केली.
येथपर्यंत सुरळीत सुरु असलेल्या श्रीरामांच्या जीवनप्रवासाने कैकयीच्या निमित्ताने कलाटणी घेतली. राज्याभिषेक करून घेण्याच्या तयारीत असलेल्या श्रीरामांच्या नशिबात राजेपण तर दूरच उलट राजधानीचाही त्याग करून वनवास येतो. इथे प्रथमच रामाचे वेगळेपण दिसून येते.
सर्वसामान्य माणूस आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध बंड करेल, नाराजी व्यक्त करेल, राज्य नको किमान अयोध्येत तरी राहू द्या असे म्हणेल. पण श्रीराम यापैकी काहीच करत नाही. श्रीराम माता कैकयीवर अजिबात रागावले नाही, भरताच्या राज्याभिषेकाच्या वार्तेने त्यांना आनंदच झाला. आई-वडिलांच्या इच्छेखातर त्यांच्या वचनपूर्तीसाठी युवराज राम आनंदाने पत्नी सीता आणि कनिष्ठ बंधू लक्ष्मणासह वनवास पत्करतात.
पुत्रवियोगाने मृत्यूचा शाप मिळालेल्या दशरथाचा राम वनवासात गेल्यावर मृत्यू होतो. मामाकडे गेलेल्या भरताला अयोध्येत बोलावल्या जाते आणि हा सगळा घटनाक्रम ऐकून भरत प्रचंड क्रोधीत होतो. अत्यंत तीव्र शब्दात कैकयीची निर्भत्सना करून तो रामाला आणायला वनवासात जातो. ज्यांची वचनपूर्ती करायची त्या पित्याचा मृत्यू झालाय. कैकयी सुद्धा पश्चात्तापदग्ध झालीय आणि भरत अयोध्येत चलण्याचा हट्ट धरून बसलाय. या संधीचा फायदा राम घेऊ शकत होते, पण इथे दुसऱ्यांदा रामाचे वेगळेपण दिसते. श्रीराम भरताचीच समजूत काढतात आणि आपल्या चरणपादुका देऊन त्याला वापस पाठवतात. रामासोबतच इथे भरताचेही वेगळेपण उठून दिसते. समोरून चालत आलेले सिंहासन दोघेही नाकारतात. श्रीराम पित्याची वचनपूर्ती या पुत्रधर्माचे तर भरत सिंहासन जेष्ठ बंधुचेच या भ्रातृधर्माचे आचरण करतात.
पुढे शूर्पणखेच्या रूपाने मोहाचाही एक परीक्षेचा क्षण येतो. एकतर वनवासात आणि त्यातही जेष्ठ असल्याने भगवान प्रभू रामचंद्रांना नाही कोण म्हणणार? पण स्वतःच स्वतःला घातलेली एकपत्नी व्रताची मर्यादा श्रीरामचंद्र पाळतात. ज्याची परिणीती रावणाद्वारे सीताहरणात होते. सीतेचा शोध घेत असतांना राम-लक्ष्मणांना हनुमंत आणि सुग्रीव भेटतात. वालीचा वध करतांना देखील रामचंद्र आपल्या भात्यातील अमोघ अस्त्र शस्त्र टाळून एका सामान्य बाणाचा प्रयोग करतात जेणेकरून वालीला तत्काळ मृत्यू न येता रामाची व प्रियजनांची भेट होऊन, सर्वांशी बोलून, सर्व शंका निरसन झाल्यावर मृत्यू यावा. मरतांना त्याच्या मनात कुठलाही संदेह नसावा. असे करून किश्किंधेचे राज्य सुग्रीवाला परत मिळवून देतात.
स्वतः राज्यपदी बसणे तर दूरच पण नगरात जायचे काम पडते तेंव्हा लक्ष्मणाला दूत म्हणून पाठवतात आणि आपण स्वतः नगराबाहेर राहतात. वनवास म्हणजे वनवास. प्रतिज्ञापालन. हाच आदर्श रावणवधानंतर सुद्धा पाळल्या गेलेला आहे. राम रावण युद्धात रावण प्रभू रामचंद्रांच्या बाणाने मृत्युमुखी पडतो. त्यानंतर त्याचा उचित अंत्यविधी केल्या जातो. इथे खरेतर लंकाधिपतीचा वध झाला असल्याने लंका रामांनी जिंकली असते. पण प्रभू लंकेच्या सिंहासनावर विभिषणाचा राज्याभिषेक करतात. आणि आपण स्वतः सीतेसह अयोध्येला परत जातात.
सत्ता, संपत्ती, स्त्री यांचा मोह भल्याभल्यांना भुरळ पाडतो. चारित्र्य जपतांना या वाटा फार निसरड्या असतात. वर आपण पाहिले अयोध्या, किष्किंधा आणि लंका तिन्ही सिंहासने प्रभू रामांच्या हातात होती पण त्यांनी सत्ता मोह टाळला आणि निस्वार्थपणे ज्याची त्याला देऊन टाकली. ऐन तरुणपणात स्वतःची काहीही चूक नसतांना केवळ सावत्र मातेच्या इच्छेखातर आणि वडिलांच्या वचनपूर्तीसाठी त्यांनी हक्काच्या राज्यपदाचा त्याग करून वनवास पत्करला. मात्या-पित्यांप्रती कुठलीही नाराजी न ठेवता, न चिडता, बंधू भरताप्रती कुठलीही द्वेषभावना न ठेवता, आनंदानी त्यांनी राज्यत्याग केला. उलट भरत न्यायला आला असता त्यालाही माता कैकयीला दोष देऊ नको असाच उपदेश केला. पुत्रधर्माच्या पालनाचा एक अत्युच्च आदर्श प्रस्थापित केला.
अयोध्या किती वैभवशाली आणि शक्तिसंपन्न चक्रवर्ती साम्राज्य होते ते आपण सुरुवातीलाच पाहिले. रावणासोबत युद्ध अटळ झाल्यावर रामाच्या मदतीला कोणीही नाही म्हंटले नसते. पण कुठल्याही प्रस्थापित राजसैन्याला न घेता सामान्य अशा नर-वानर-अस्वल, दलित, शोषित, वनवासी, आदिवासी गिरीजन यांचे सहकार्य घेतले. हे सर्व वनवास पत्करल्यानंतर रामाच्या संपर्कात आले होते. अयोध्येचा त्याग करून वनवासात गेल्यावर अयोध्येशी संबंधित कोणाचीही मदत घेणे टाळले आणि वनवासाची मर्यादा निष्ठुरपणे काटेकोर पाळली. किष्किंधा आणि लंका जिंकल्यावरही साम्राज्यविस्ताराचा मोह त्यांना झाला नाही. सुग्रीव आणि विभीषण त्यांचे मित्रच राहिले त्यांना अयोध्येचे मांडलिक किंवा गुलाम म्हणून न वागवता मित्रत्वाच्या बरोबरीच्या नात्याने त्यांना सन्मान दिला. अयोध्येत परतल्यावरही त्यांचा योग्य तो आदर सत्कार केल्या गेला.
शूर्पणखा तर आपण होऊन तयारच होती. पण वाली वधानंतर तारा व रुमा आणि रावण वधानंतर मंदोदरी यांच्यावरही राम हक्क दाखवु शकले असते. त्याकाळी ती पद्धतच होती. खुद्द दशरथालाही तीन राण्या होत्या. आणि तारा ही तर शास्त्रार्थ जाणणारी विदुषी होती. अहिल्या द्रौपदी कुंती तारा मंदोदरी या महान पंचकन्या. ज्यात तारा आणि मंदोदरीचा समावेश आहे. सत्ता संपत्तीच्या मोहावर विजय मिळवता येईल, पण स्त्री मोह? प्रत्यक्ष विश्वामित्राचीही तपश्चर्या भंग व्हायला मेनकाच कारणीभूत ठरली होती. पण प्रभू श्रीराम सर्व मोह मायांवर विजय मिळवून पतीधर्म सांभाळत एकपत्नी व्रताचे पालन करतात.
प्रभू श्रीरामचंद्र हे विष्णूचा अवतार होते. पण मानवी देह धारण केल्यावर ते मानवी विकारांना बळी पडले नाही हे वरील सर्व प्रसंगात आपल्याला प्रकर्षाने दिसून येते. उलट संपूर्ण आयुष्य त्यांनी विवेकाने निष्कपट, निरपेक्ष, निर्लोभी, निस्वार्थी, न्यायी भावनेने व्यतीत केले आणि मानवी देहात असूनही देवत्व प्राप्त केले. दुसऱ्या बाजूने विचार केला असता असे दिसून येते कि विष्णूचा अवतार असल्याने त्यांना अशक्य असे काहीच नव्हते. सर्व दैवी शक्ती त्यांच्या पाठीशी होत्या. पण हे माहित असूनही आत्ता आपण मानव देहात आहोत आणि त्या देहाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांचा त्यांनी कधी विसर पडू दिला नाही. सुग्रीव आणि वाली युद्धात शरीर साधर्म्यामुळे सुग्रीवाला ओळखू न शकणे असा उल्लेख आहे. ही दैवी अवताराची नाही सामान्य माणसाचीच मर्यादा आहे.
अगदी रावणासोबतच्या मायावी युद्धात किंवा शेवटी एक शिर उडविल्यावर लगेच दुसरे शिर तयार दिसतांना देखील त्यांनी दैवी शक्तीने हे जाणले असे होत नाही तर विभीषण त्यांना रावण वधाचा मार्ग सांगतो आणि कुठलाही दैवी चमत्कार न करता प्रभू श्रीरामचंद्र आपल्या मानवी देहाच्या मर्यादा जपत सांभाळत आपल्या अवताराचे विहित कर्तव्य जे कि रावणवध ते पूर्ण करतात.
मानवी देहात असून मानवी विकारांना बळी न पडणे आणि दैवी अवतार असूनही नरदेहाच्या मर्यादेत राहून कुठलेही चमत्कार न करता नरदेहाला शक्य आहेत त्या आणि तेव्हढ्याच मार्गांनी लक्ष्यप्राप्ती व रावणवध केलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र यांचा आदर्श प्रत्येकांनी ठेवून त्याप्रमाणे सदाचरण करण्याचा प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. आज आपल्या पारंपारिक मूल्यसंस्था ढासळत असतांना, तरुणांसमोर कुठलाही आदर्श नसताना श्रीरामाचे स्मरण करणे, श्रीरामकथेचे श्रवण करणे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श ठेवून संस्कारांची पुनर्स्थापना करणे महत्वाचे आहे. आज श्रीरामनवमीच्या दिवशी हाच संकल्प करूया. जय श्रीराम.
श्रीराम बरबडे
९९२११३७९९९ mangeshbarbade11@gmail.com