काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ श्रीराम नवमीच्या पावन दिवशी नाशिक दौर्यावर होते. शहरात दिसेनाशा झालेल्या काँग्रेस संघटनेला उर्जितावस्था देण्यासाठी त्यांचा हा नाशिक दौरा असला, तरी संघटनेत ऊर्जा आणण्याऐवजी सपकाळ कार्यकर्त्यांना सैरभैर करून गेले. श्रीराम नवमीला सपकाळ थेट संविधानाची प्रत घेऊन काळाराम मंदिरात दर्शनाला गेले. यावेळी त्यांनी महंत सुधीरदास यांना संविधानाची प्रत भेट दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंदिरप्रवेश नाकारल्याच्या गोष्टीची आठवण करून देत, सपकाळ यांनी श्री काळारामाचे दर्शन घेतले. मुळात काळाराम मंदिर खुले करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कशा प्रकारची वागणूक दिली, हे काँग्रेसने झाकून ठेवले, तरीही जनतेला सत्य ठावूक आहेच. काँग्रेसने कायमच संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव करण्यापासून ते संविधान सभेत काम करताना काँग्रेसने डॉ. बाबासाहेबांना राज्यघटनेत समस्त मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी, सर्वांगीण विकासासाठी हव्या तशा तरतुदी करू दिल्या नाहीत. म्हणूनच, “काँग्रेस हे जळते घर आहे,” असे विधान खुद्द डॉ. आंबेडकरांनीही केले होते. पण, आज तोच काँग्रेस पक्ष ‘संविधान खतरे में हैं’ म्हणत आणि हातात संविधान घेत आंबेडकरी अनुयायांची आणि समस्त देशवासीयांची फसवणूक करताना दिसतो. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रभू श्रीरामाला तर काल्पनिक ठरवले होते. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गांधी कुटुंबाने दांडी मारली. हा सगळा इतिहास विसरून काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काळाराम मंदिरात दर्शनाला गेले. मात्र, तिथेही त्यांनी दर्शन कमी आणि ‘शो’बाजी जास्त केली. सपकाळ भले सांगत आहेत की, “मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून दर्शनाला आलो.” मात्र, केवळ शोबाजीसाठी आणि वातावरण गढूळ करायला ते आल्याचे स्पष्ट दिसत होते. एकेकाळी प्रभू श्रीरामांचा तिरस्कार करणारी काँग्रेस आता रामनामासाठी आग्रह धरत असून, श्रीराम नवमीच्या पवित्र दिवशी काँग्रेस नेते रामरायाच्या दर्शनाचा आव आणत आहेत. मात्र, नानांप्रमाणेच सपकाळदेखील शोबाजीत अव्वल निघाले, हे मात्र नक्की!
आणखी एक ‘फ्लॉप शो!’
भारत जोडो यात्रे’च्या ‘फ्लॉप शो’नंतर तरी किमान राहुल गांधी थांबतील, असे वाटले होते. पण, नाही. आता ‘डरो मत’ म्हणत स्वतःच्याच काँग्रेसी नेत्यांना घाबरविण्याचे काम ते नित्यनेमाने करत आहेत. हिमंता बिस्व सरमा यांना भेटण्याऐवजी राहुल कुत्र्यांना भेटत बसले आणि बोलता बोलता हिमंता भाजपवासी झाले. नुसते भाजपवासी नाही झाले, तर सध्या ते आसामचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. निवडणुका आल्या की राहुल एकाएकी सक्रिय होतात आणि एरवी ते कुठे असतात, हे कोडेच. निवडणुका जिंकल्या की जनतेला धन्यवाद आणि हरल्या की बिचार्या ‘ईव्हीएम’ला शिव्याशाप. राहुल गांधींचा झालेला घोळ अजूनही संपलेला नाही. आता याच वर्षी बिहार विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. अशात बिहारचे वातावरण गढूळ केल्याशिवाय राहुल स्वस्थ तरी कसे बसतील? लागलीच त्यांनी जोरबैठका काढण्यास सुरुवातदेखील केली. बेगूसराय येथे काँग्रेसच्या ‘नोकरी दो, पलायन रोको’ यात्रेत ते सहभागी झाले. अर्धा तास यात्रेत त्यांनी एक किमी अंतर कापले. अंगात ठरलेला पांढरा शर्ट होताच. त्याला जोड म्हणून अन्य कार्यकर्त्यांनीही तोच कित्ता गिरवला. या यात्रेचा म्होरक्या कोण, तर ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणारा भारतविरोधी व काँग्रेसचा नेता कन्हैया कुमार. बेगूसराय हा भाजपच्या गिरीराज सिंह यांचा बालेकिल्ला. इथूनच त्यांनी कन्हैयासारख्या भारतविरोधीला लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली होती. राहुल गांधी अर्धा तास थांबले, परंतु त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा घोर अपमान केला. 15 दिवस मेहनत करून कार्यकर्त्यांनी या यात्रेची तयारी केली होती. मात्र, राहुल आले आणि ‘टाटा टाटा-बाय बाय’ करत हात हेलकावत पटनाच्या दिशेने रवाना झाले. ना कार्यकर्त्यांना भेटले, ना विचारपूस केली. पटनातही त्यांनी ‘संविधान सुरक्षा संमेलना’त अनेक मुक्ताफळे उधळली. भारतीय संविधान हजारो वर्षे जुने असल्याचे सांगत राहुल यांनी आपल्या अकलेचे तारे नुसते तोडले नाहीत, तर अक्षरशः ओरबाडून काढले. अशा प्रकारे राहुल यांनाच संविधानाविषयी माहिती नाही, मात्र संविधानाची प्रत ते हातात घेऊन फिरतात. राहुल यांनी असे अकलेचे तारे तोडण्याऐवजी संविधान एकदा खरोखर वाचावे, जे त्यांनी हातात घेतले, पण अजून वाचलेले नाही.