दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट! 'त्या' डॉक्टरांचा राजीनामा

07 Apr 2025 16:53:58
 
Dinanath Mangeshkar Hospital
 
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेला उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न भरल्याने साडेपाच तास तिच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर सगळीकडून टीका करण्यात येत होती.
 
हे वाचलंत का? -  दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मृत्यू प्रकरण! आरोग्य विभागाच्या अहवाल काय?
 
या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाकडून एक समितीही गठित करण्यात आली असून त्यांचा अहवाल समोर आला आहे. दरम्यान, भिसे कुटुंबियांनी नुकतीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. तसेच आमची खासगी माहिती जाहीर केल्यामुळे डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली होती. डॉ. घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेला असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील नातेवाईकांनी केली होती.
 
या सगळ्यानंतर आता डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर आता याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0