बीएसएफला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

    07-Apr-2025
Total Views |

 Amit Shah
नवी दिल्ली (Amit Shah) : केंद्र सरकार प्रगत तंत्रज्ञानासह सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याचप्रमाणे सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या पाठिशी केंद्र सरकार भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिली. जम्मू – काश्मीरमधील कठुआ येथील 'विनय' सीमा चौकीवरील बीएसएफ जवानांना संबोधित ते बोलत होते.
सीमेवर तैनातीसाठी इलेक्ट्रॉनिक देखरेख प्रणालीचे दोन मॉडेल तयार करण्यात आले आहेत आणि संपूर्ण सीमेवर त्यांची तैनाती झाल्यानंतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूने केलेल्या कोणत्याही कृतीस चोख प्रत्युत्तर देणे अधिक सोपे होईल. यासोबतच, घुसखोरी ओळखण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोगदा शोधून नष्ट करण्यासाठी अनेक प्रयोग केले गेले आहेत. येत्या काही वर्षांतच संपूर्ण भारत-पाक आणि भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांना तांत्रिक सहाय्याने सुसज्ज केले जाईल. ड्रोनविरोधी तंत्रज्ञान, बोगदा ओळख तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक देखरेख यासारख्या पैलूंचा समावेश असलेल्या २६ हून अधिक तंत्रज्ञानाशी संबंधित उपक्रमांच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. पुढील मार्चपर्यंत या सर्व चाचण्यांचे काही निकाल लागण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
जम्मू प्रदेशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर देखरेख करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवान आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी कौतुक केले. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत बीएसएफचा गौरवशाली इतिहास आहे. बीएसएफ ही आपल्या सुरक्षेची पहिली फळी आहे आणि या दलाने नेहमीच ही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पाकिस्तानसोबतच्या प्रत्येक युद्धात आपल्या बीएसएफ सैनिकांचे योगदान भारतीय सैन्याइतकेच मोठे राहिले आहे, असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी नमूद केले आहे.
हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज जम्मूमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अनुकंपा तत्वावर ९ नामनिर्देशित अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे दिली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी हुतात्मा पोलिस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.