ठाणे: ( traffic on Ghodbunder Road ) माजिवडा मेट्रो स्थानकावर छत उभारणीच्या कामामुळे माजिवडा उड्डाणपुलावरून मुंबईहून नाशिक, घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक १५ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत हे वाहतूक बदल लागू राहणार आहेत. त्यामुळे घोडबंदर रोडवर रविवार, दि. 20 एप्रिल रोजीपर्यंत वाहतुककोंडीचा सामना करावा लागणार आहे. येथील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे.
ठाणे शहरातून मुंबई-नाशिक तसेच घोडबंदर रोड असे दोन महामार्ग जातात. हे दोन्ही महामार्ग माजिवडा भागात एकमेकांना जोडण्यात आले आहेत. या ठिकाणी माजिवडा उड्डाण पूल आहे. या पुलाशेजारीच माजिवडा मेट्रो स्थानकाच्या छत उभारणीच्या कामासाठी ‘जॅक बीम’ टाकण्यात येणार आहेत. दि. ५ एप्रिल रोजीपासून हे काम सुरू झाले असून ते दि. २० एप्रिल रोजीपर्यंत सुरू राहणार आहे. या कामामुळे वाहतूक शाखेने वाहतुकीत बदल केले आहेत. याबाबतची अधिसूचना ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जारी केली आहे.
मुंबईकडून माजिवडा उड्डाणपुलावरून ज्युपिटर रुग्णालयमार्गे घोडबंदरकडे अथवा भिवंडीकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना विवियाना मॉलसमोर उड्डाणपुलावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कापूरबावडी सर्कलपर्यंत वाहतुककोंडी होणार असल्याने कामावरून रात्री घरी परतताना विलंब होणार आहे. १५ दिवस हा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागणार आहे.
- निखिल राव, घोडबंदर रोड