( new Pamban railway bridge ) राष्ट्रसेवेचा प्रण घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात खर्या अर्थाने नव्या भारताची पायाभरणी होत आहे. देश पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीत वेगवान प्रगती करत असून, भारतीय रेल्वेचादेखील यामध्ये मोलाचा वाटा. याचेच उदाहरण सांगायचे झाले तर, आज श्रीरामनवमीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असलेला तामिळनाडूतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारा पंबन रेल्वे पूल...
भारताच्या सर्वोच्च दक्षिण टोकावर, तामिळनाडूच्या निळ्याशार समुद्रावर उभारण्यात आलेला पंबन रेल्वे पूल भारतीय रेल्वेच्या विस्तार आणि अभियांत्रिकी कौशल्यांचे चित्र रेखाटणारा आहे. हा भारतातील पहिला ‘लिफ्ट’ होणारा समुद्रीपूल आहे, जो रामेश्वरम बेटाला तामिळनाडूमधील मंडपमशी जोडतो. हा पूल केवळ दोन ठिकाणांना जोडण्याचे माध्यम नाही, तर भारताच्या प्रगत अभियांत्रिकी कौशल्ये आणि तंत्रज्ञानाचेही प्रतीक आहे. यासोबतच ‘आत्मनिर्भर भारता’च्या शिरपेचातील एक मानाचा तुराही आहे.
नवीन पंबन रेल्वे पुलाची अद्वितीय ‘लिफ्ट सिस्टम’ मोठ्या जहाजांना सहज ये-जा करण्यास अनुमती देते. मन्नारच्या आखातावर स्थित हा पूल रेल्वे तसेच जहाजांची रहदारी सुकर करतो. या पुलाचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्वदेखील आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेला हा पूल भारतीय रेल्वेमार्गातील एक अद्वितीय उपलब्धी आहे, जी आगामी काळात समुद्रमार्ग पर्यटन आणि व्यवसायवाढीला चालना देणारी ठरेल.
वाहतुकीच्या नवीन युगात...
1911 मध्ये भारतातील या पहिल्या समुद्रमार्गे रेल्वे पूल पंबन पुलाचे बांधकाम सुरू झाले. 1914 मध्ये हे बांधकाम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 2010 मध्ये वांद्रे-वरळी सी लिंक वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत भारतातील पंबन पूल हा भारतातील एकमेव समुद्रीपूल होता. दरम्यानच्या काळात या पुलाने अनेक आव्हाने पेलली. 1964 साली आलेल्या चक्रीवादळामुळे या पुलाचे मोठे नुकसान झाले होते, असे असूनही तो समुद्राच्या लाटांवर ठामपणे उभा होता. तब्बल 106 वर्षे राष्ट्रहितासाठी समर्पितपणे कार्यरत होता.
21व्या शतकातील वाहतुकीच्या वाढत्या गरजा आणि बदलत्या आवश्यकतांमुळे जुन्या पुलासमोर अनेकविध आव्हाने उभी ठाकली. नव्या आधुनिक तंत्रसज्ज गाड्या आणि समुद्रमार्गे वाहतूक करणारी मोठी जहाजे ही आव्हाने पूर्ण करण्यासाठी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या नवीन पुलाच्या बांधकामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. नावीन्यपूर्णतेचा ध्यास आणि विकासाच्या अभूतपूर्व गतीमुळे समुद्रावरील हे आश्चर्यकारक बांधकाम अवघ्या चार वर्षांत पूर्ण झाले.
पंबन पुलाची ठळक वैशिष्ट्ये
2.08 किमीची ही भव्य रचना जुन्या पंबन पुलापेक्षा तीन मीटर उंच आहे, जेणेकरून लहान जहाजे सहजतेने या पुलाखालून मार्गक्रमण करू शकतात. हा संपूर्ण पूल तयार करण्यासाठी 18.3 मीटरच्या 99 स्पॅनचा वापर केला गेला आहे. तसेच पुलाच्या मध्यभागी 72.5 मीटर उभ्या लिफ्टचा वापर केला गेला आहे, जो आवश्यक असल्यास मोठ्या जहाजांसाठी 17 मीटरपर्यंत वाढविला जाऊ शकतो. हा पूल 333 पाईल्स आणि 101 पाईल कॅप्स वापरून मजबूत पाया असलेल्या दुपदरी रेल्वे मार्गांसाठी डिझाईन केला आहे, ज्यावर जड मालवाहतूक गाड्यांसह ‘वंदे भारत’सारख्या वेगवान धावणार्या अत्याधुनिक सेमी हायस्पीड गाड्यादेखील सहजपणे जाऊ शकतात.
तसेच, पुलाचा पृष्ठभाग 58 वर्षे मजबुतीने टिकेल, अशी एक उत्कृष्ट सुरक्षा प्रणाली स्वीकारली गेली आहे. या पुलाच्या बांधकामादरम्यान वादळ, जोरदार वारा आणि समुद्राची भरती-ओहोटी यांसारख्या विशेष परिस्थितीचीही काळजी घेतली गेली आहे. पॉलीसिलक्सेन पेंट, स्टेनलेस स्टील आणि फायबर प्रबलित प्लास्टिक (एफआरपी)चा वापर केल्याने समुद्राच्या खार्या पाण्यातही हा पूल वर्षानुवर्षे मजबूत असेल. हा पूल जुन्या पुलापेक्षा अधिक टिकाऊ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारला आहे. ‘ब’ नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण झाला आहे.
डिझाईनमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश
या पुलाची रचना आंतरराष्ट्रीय सल्लागार ‘टायप्सा’ (ढधझडअ)ने डिझाईन केली आहे. हे डिझाईन ‘आयआयटी चेन्नई’ आणि ‘आयआयटी मुंबई’ यांनी डिझाईनची पडताळणी करून अंतिम केले आहे. उच्च ग्रेड मटेरियल आणि स्टेनलेस स्टीलचा वापर यामुळे एक टणक, सुरक्षित आणि कमी देखभाल असणारी ही रचना तयार करण्यात आली आहे.
विश्वास आणि प्रगतीचा संगम
प्रभू श्रीराम आणि भगवान शिव यांच्याशी या पुलाचा थेट संबंध आहे. रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारे बेट हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानले जाते. येथे स्थित रामेश्वरम मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. असे मानले जाते की, जेव्हा भगवान श्रीराम लंकेवर चालून गेले, तेव्हा त्यांनी हे ज्योतिर्लिंग स्थापित केले आणि भगवान शिवाची उपासना केली. रामायणातील कथेनुसार, भगवान श्रीराम आणि त्यांच्या वानरसेनेने लंकेच्या दिशेने जाण्यासाठी जो पूल बांधला, तो सध्याच्या पंबन पुलाजवळ आहे. हे पाहता, नवीन पांबन पूल रामेश्वरमला भेट देणार्या रामभक्तांसाठी अभूतपूर्व अनुभव देणारा असेल.
गौरवशाली कामगिरी
नवीन पंबन पूल भारताच्या नावीन्यपूर्ण क्षमतेचे, अद्वितीय अभियांत्रिकी कौशल्यांचे आणि समृद्ध भारताची तांत्रिक प्रगती, आत्मनिर्भरता आणि आधुनिकीकरणाच्या दिशेने वचनबद्धता याचा पुरावा आहे. आज दि. 6 एप्रिल रोजी श्रीरामनवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हा पूल देशाला समर्पित करतील. त्यानंतर हा पूल पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संवादाला एक नवीन आयाम देईल. या पुलामुळे रहदारी आणि वाहतूक वेगवान होईल, ज्यामुळे भारताच्या प्रगती आणि समृद्धीला वेग मिळेल.
गायत्री श्रीगोंदेकर