जॅकलीन फर्नांडिसवर दु:खाचा जबर धक्का! सविस्तर वाचा...

06 Apr 2025 13:50:34
 
 
a huge blow to jacqueline fernandez
 
 
मुंबई : जॅकलीन फर्नांडिस च्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्यी माहितीनुसार जॅकलीन ची आई किम फर्नांडिस यांचे आज ६ एप्रिल रोजी, मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. गेल्या महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
 
जॅकलीनचे वडील एलरॉय फर्नांडिस यांना यापूर्वी रुग्णालयाबाहेर पाहिले गेले होते. किम यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्या तिथेच उपचार घेत होत्या. गेल्या काही आठवड्यांपासून जॅकलीन आपल्या आईची नियमितपणे भेट घेत होती. गेल्या महिन्यात गुवाहाटीमध्ये झालेल्या आय.पी.एल उद्घाटन समारंभाला जॅकलीन अनुपस्थित राहिली होती. त्यावेळी एका सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे, "जॅकलीन यांची आई अजूनही आयसीयू मध्ये आहेत आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीची वाट पाहत असताना जॅकलीन त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या आय.पी.एल कार्यक्रमात हजर राहू शकल्या नाहीत."
 
 
एका जुन्या मुलाखतीत जॅकलीन ने आपल्या आईबद्दल सांगितले होते की, ''माझी आई नेहमीच माझा आधार राहिली आहे. मी तिला खूप मिस करते. मी इथे आईवडिलांशिवाय एकटीच राहते. माझ्या आयुष्यातले हे दोन लोकं खूप बळकट आहेत आणि त्यांनी मला नेहमी प्रेरणा दिली आहे.''
 
 
जॅकलीनचा जन्म बहरीनमधील मनामामध्ये झाला असून ती एक बहुपरिषद पार्श्वभूमीत वाढली. त्यांची आई किम या मलेशियन आणि कॅनेडियन वंशाच्या होत्या, तर वडील एलरॉय फर्नांडिस हे श्रीलंकेचे आहेत. १९८०च्या दशकात किम या एअर होस्टेस म्हणून काम करत असताना एलरॉय यांच्याशी त्यांची भेट झाली होती.



Powered By Sangraha 9.0