चर्चच्या आखाड्यातील घंटा

    06-Apr-2025   
Total Views |

Church Wrestling
प्रार्थनास्थळे म्हणजे लोकांनी एकत्र येण्याची जागा. पाश्चिमात्य देशांमध्ये चर्चच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणायचे काम झाले. परंतु, कालौघात चर्चमध्येदेखील लोकांचा येणारा ओघ आटला. लोकांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी काय केले पाहिजे, याबद्दल विचारविमर्श सुरू असताना, लंडनमध्ये गॅरेथ थॉम्पसन या युवकाने वेगळीच शक्कल लढवली. या युवकाने चर्चच्या आवारात नुकतेच कुस्तीचे सामने सुरू केले. जॉन सिना, अंडरटेकर या सगळ्यांना टीव्हीवर बघत देशविदेशांतील अनेक तरुण मोठे झाले. गॅरेथ थॉम्पसन हासुद्धा त्यातलाच एक. त्याच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल सांगताना तो म्हणाला की, “त्याच्या जीवनाच्या अवघड वळणांवर कुस्तीनेच मला मदतीचा हात दिला. ज्यावेळेला मी एखादी कुस्ती बघतो, त्यावेळेस मला बायबलमध्ये वाचलेल्या कथा आठवतात. कुस्तीच्या जगामध्ये एकप्रकारे याच कथा आपण कळत-नकळत अनुभवत असतो.”
 
इंग्लंडमधील शिपले या शहराच्या सेंट पीटर्स या चर्चमध्ये कुस्तीचे अनेक सामने रंगत असतात. ज्या चर्चमध्ये कोणे एके काळी शुकशुकाट होता, तिथे आता लोकांची वर्दळ असते. प्रार्थना करून झाल्यावर या कुस्तीच्या सामन्यांना सुरुवात होते. दरमहा 200 पेक्षा जास्त लोक नित्यनेमाने कुस्तीचे सामने बघायला हजेरी लावतात. थॉम्पसनच्या मते, एकप्रकारचा ’संघटित हल्लकल्लोळ’ इथे सुरू असतो. प्रार्थनेच्या नंतरचे दोन तास लोक कुस्तीचा सामना बघण्यात रंगून जातात. थोडक्यात काय तर ख्रिस्ती बांधवांची पाऊले चर्चकडे वळावी, म्हणून लढवलेली ही आणखीन एक नामी शक्कल!
 
2022 साली पहिल्यांदा हा प्रकार सुरू झाला. सेंट पीटर्स चर्चच्या रेवरंड नताशा थॉमस म्हणतात की, “सुरुवातीला आम्हालासुद्धा ही संकल्पना चमत्कारिक वाटली. कारण, लोकांना अशा ठिकाणी सहभागी होण्याची इच्छा नसते. परंतु, कुस्तीच्या निमित्ताने लोक एकत्र येतात आणि त्यांचा एक समूह तयार होतो. ही समूहनिर्मितीची प्रक्रिया ज्या काळात कमी होते आहे, त्या काळात अशा प्रकारे लोकांनी एकत्र येणे, ही दिलासादायक बाब आहे. सुरुवातीला चर्चला नियमितपणे येणार्‍या लोकांनी या सगळ्या प्रकाराकडे शंकेच्या नजरेतूनच बघितले. परंतु, नंतर कुस्तीच्या निमित्ताने एकत्र येणारे लोक, त्यांचा उत्साह आणि एकूणच वातावरणातील ऊर्जा यांमुळे ते लोकसुद्धा फार काळ दूर राहू शकले नाही.”
 
चर्चमध्ये रंगणार्‍या या कुस्तीच्या आखाड्याच्या माध्यमातून गॅरेथ थॉम्पसन आता स्थानिकांना रोजगाराच्या काही संधीसुद्धा उपलब्ध करून देतो. स्त्रियांसाठी स्वयंसुरक्षेचे वर्गदेखील तो आयोजित करतो. इंगलंडमध्ये वाट चुकलेले अनेक शाळाबाह्य विद्यार्थी आहेत. त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कामसुद्धा गॅरेथ करतो. पुरुषांचे मानसिक आजार, नैराश्य यावर बर्‍याचदा समाजात मौन पाळले जाते. मनाने तुटलेल्या अशा पुरुषांना आधार देण्याचेही शिवधनुष्य गॅरेथने पेलले आहे. एकप्रकारे लोकांचे समूहभान जागृत करणार्‍या या उपक्रमाला लोकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला असल्याचे दिसून येते. काही माणसे इथे केवळ श्रद्धेपोटी येतात, तर काही माणसे फक्त कुस्तीसाठी. गॅरेथला त्याचा हा उपक्रम संपूर्ण इंग्लंडमध्ये राबवायचा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न समूहांतील लोकांना एकत्र आणणे हा त्यामागचा हेतू. काही लोकांच्या मते, कुस्ती आणि चर्च (क्रमाने धर्म) या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत. गॅरेथच्या म्हणण्यानुसार, आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, ती गोष्ट आपल्यासाठी खरी होते. आपल्या आयुष्यात लोक अविश्वास बाजूला सारून आशावादी होतात आणि त्यांना आशावादी बनवणे हाच अशा उपक्रमांमागचा उद्देश आहे.
 
आता येशूच्या दारी येणारे आशावादी होतील की नाही हे सांगणे म्हणा अवघडच. पण, यानिमित्ताने जगाच्या पाठीवर चर्चमधील घटत्या उपस्थितीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अमेरिकेसारख्या देशात तर चर्चला जाणार्‍यांचे प्रमाण 42 टक्क्यांवरुन 30 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. ख्रिश्चन धर्माशी फारकत घेऊन ‘पे ीशश्रळसर्ळेीी रषषळश्रळरींळेप’ म्हणण्याच्या निधर्मी संस्कृतीने अमेरिकेसह पाश्चिमात्त्य देशांनाही आता चिंतातूर करुन सोडले आहे. धर्मापासून दुरावलेल्या समाजावरील परिणाम आज अमेरिकेसह युरोपात दृश्य स्वरुपात आहेत. म्हणूनच चर्चने आता कुस्तीचे आखाडे भरवून वाजवलेली एकप्रकारे ही धोक्याचीच घंटा!

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.