१०० वर्षांनी मुंबईच्या जंगलातून लागला 'या' ढालकिड्याचा पुनर्शोध; महाराष्ट्रातील पहिलीच नोंद

    06-Apr-2025
Total Views |
Mumbai sanjay gandhi national park



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - धान्यावर येणाऱ्या बुरशीवर अन्नग्रहण करणाऱ्या 'ट्रोकोइडियस डेस्जार्डिन्सी' या ढाल किड्याच्या प्रजातीचा १०० वर्षांनी भारतामधून पुनर्शोध लागला आहे (Mumbai sanjay gandhi national park). मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ही प्रजात किटकशास्त्रज्ञांना आढळून आली असून महाराष्ट्रातील ही या किड्याची पहिलीच नोंद आहे. (Mumbai sanjay gandhi national park)

भारतात कीटकशास्त्रामध्ये अजूनही फारसे संशोधनाचे काम झालेले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये कीटकशास्त्रात रस असणारी एक फळी निर्माण झालेली आहे. परिणामी कीटकांच्या काही प्रजातींचा उलगडा होण्यास मदत झाली आहे. ट्रोकोइडियस या कुळात जगभरात १९ प्रजाती आढळतात. त्यापैकी ट्रोकोइडियस डेस्जार्डिन्सी ही प्रजात बोर्नियो, क्युबा, फिजी बेट, इंडोनेशिया, जपान, जावा, केनिया, मादागास्कर, मलेशिया, माॅरिशस, मायक्रोनेशिया, म्यानमार, पापुआ-न्यू गिनी, फिलीपिन्स, सामोआ, सेशेल्स, श्रीलंका, तैवान, टांझानिया, युगांडा आणि युनायटेड स्टेट्समध्ये आढळते. ब्रिटीश शास्त्रज्ञ अॅरो यांनी १९२५ साली प्रसिद्ध केलेल्या अहवालात या प्रजातीची नोंद भारतामधील केरळ आणि अंदमान बेटावर असल्याचे म्हटले होते. त्यानंतरच्या कालावधीत कोण्याही किटकशास्त्रज्ञाने वा तज्ज्ञाने या प्रजातीची नोंद केली नाही. मात्र, आता ही प्रजात मुंबईत आढळून आली आहे. या प्रजातीची नोंद सोमय्या महाविद्यालयाचे दृष्टी दनानी, हर्षद पारेकर आणि अमोल पटवर्धन यांनी केली आहे. यासंबंधीचे वृत्त एंटोमोन या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे.

ट्रोकोइडियस डेस्जार्डिन्सी ही प्रजात ३ मिमी आकाराची आहे. ती मातकट रंगाची असून तिच्या डोक्यावरच्या स्पर्शिका या वैशिष्टपूर्ण आहेत. या प्रजातीच्या अळ्या या वाळवीच्या वारुळात वाढतात. तर प्रौढ हे नारळ्याच्या झाडाखाली सडून पडलेल्या झावळ्यांच्या खाली आसरा घेतात. धान्यावर आलेल्या बुरशीवर हे किडे अन्नग्रहण करत असल्याची माहिती अमोल पटवर्धन यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. धानाच्या निर्यातीमधून हे किडे न्यूझीलंडपर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. मात्र, न्यूझीलंडमध्ये निर्यातीच्या मालातील हे किडे नष्ट केले जातात. या प्रजातीवर अभ्यास करण्याची गरज पटवर्धन यांनी बोलून दाखवली आहे.