‘प्रभू श्रीराम म्हणजे जीवनाच्या मूल्यांचा सर्वोच्च बिंदू’ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

06 Apr 2025 16:22:59

Chief Minister Devendra Fadnavis ramnavmi programe
 
मुंबई: (  Chief Minister Devendra Fadnavis ramnavmi programe ) “प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जीवनाची मूल्ये काय असावी, याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी केले. मानखुर्द येथे ‘संजोग सोसायटी’च्यावतीने आयोजित संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
 
यावेळी भाजप आ. प्रवीण दरेकर, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, भाजपचे माध्यम प्रमुख आणि ‘संजोग सोसायटी’चे अध्यक्ष नवनाथ बन, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष तथा ‘श्री सिद्धिविनायक न्यासा’चे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “रामनवमीच्या पूर्वसंध्येला ‘संजोग सोसायटी’मध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याचा योग आला, याचा आनंद आहे. प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जीवनाची मूल्ये काय असावी, याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहे. त्यामुळेच आपण अतिशय उत्साहात रामनवमी साजरी करतो.
 
सत्याच्या मार्गाने असत्याचा निःपात करता येतो
 
“ज्यावेळी सामान्य माणूसदेखील सत्याच्या मार्गाने चालतो, त्यावेळी असत्य कितीही मोठे आणि असुरी असले, तरी त्याचा निःपात ते करू शकते. संपूर्ण रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांनी आपल्याला हा धडा दिला आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला प्रभू श्रीरामांनी आम्हा सगळ्यांना योग्य मार्गावर चालण्याचा आशीर्वाद द्यावा. त्यांनी तयार केलेल्या उच्च मूल्यांचे पालन करण्याची प्रेरणा द्यावी,” असेही ते म्हणाले.
 
फडणवीसांच्या नेतृत्वात विकासाची खात्री
 
रामनवमीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते संजोग मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यामुळे हा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. सर्वांचे लाडके देवाभाऊ आमच्या ‘संजोग सोसायटी’मध्ये आले, ही भाग्याची गोष्ट आहे. मानखुर्दसारख्या परिसरात फडणवीसांसारखे मुख्यमंत्री येणे, ही अभिमानाची बाब आहे. मानखुर्द हा हातावर पोट असलेल्या गरीब लोकांचा परिसर आहे. अशा भागांचा विकास व्हावा, असे स्वप्न भारतीय जनता पक्ष सातत्याने बघत असतो. भाजप आणि फडणवीसांच्या नेतृत्वात येणार्‍या काळात या परिसराचा विकास होईल, अशी खात्री आहे.
 
- नवनाथ बन, अध्यक्ष, संजोग सोसायटी
Powered By Sangraha 9.0