मुंबई : (Matoshree Ramabai Ambedkar Maternity Hospital) मुंबईतील चेंबूर पूर्व येथे असणाऱ्या मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृहाची तज्ञांच्या समितीमार्फत पाहणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही अद्याप कोणतीही पाहणी झालेली नाही. यासंदर्भात माजी नगरसेविका आणि सुधारणा समितीच्या सदस्या आशा मराठे यांनी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून तातडीने पाहणी करुन अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्याची विनंती केली आहे.
या पत्रात म्हटल्याप्रमाणे, गेल्यावर्षी भांडूप येथील महापालिका रूग्णालयात मोबाईलच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करताना महिला व तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या ३० प्रसूतीगृहांची पाहणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने ८ सदस्यीय तज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. परंतु या तज्ञांच्या समितीने मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृहाची १ वर्षे उलटून गेले तरीही अद्यापही पाहणी करून आपला अहवाल उच्च न्यायालयाकडे सुपूर्द केलेला नाही. यावरून लोकांच्या आरोग्याबद्दल आणि जीवितहानी वाचविण्यासाठी कमालीची उदासिनता महापालिका दाखवत आहे हे लक्षात येते. वास्तविक ही पाहणी न करून उच्च न्यायालयाचा अवमान महापालिका करीत आहे.
चेंबूरनाका येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर रूग्णालयाची पाहणी करण्याने तेथील आरोग्य सुविधांचे सर्व्हेक्षण, वैद्यकिय कर्मचारी, तिथे काम करणाऱ्या सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणे आणि या प्रसुतीगृहाची रूग्णसेवेची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा होऊन त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना यांचा लेखा-जोखा होणार होता. परंतु ते सर्व होऊ नये म्हणून तर पाहणी करण्यास समिती टाळाटाळ करीत नाही ना? अशी शंका वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पालिका प्रशासन जनतेच्या आरोग्याशी निर्दयीपणे खेळत आहे असे वाटते. तेव्हा तातडीने माता रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृहाची पाहणी करून अहवाल सादर करावा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.