मुंबईतील गिरणगाव म्हणजे संस्कृतीचे संचित घेऊन जगणारी नगरी. या नगरीचा उगम, त्यातील कामोगारांची चळवळ, इथल्या निरनिराळ्या माणसांच्या गोष्टी हे सारे वैभव अशोक राणे यांनी आपल्या ‘आणखी एक मोहेंजोदारो’ या माहितीपटात रेखाटले आहे. नुकतेच ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलना’त या माहितीपटाचे प्रदर्शन पार पडले. त्यानिमित्ताने या माहितीपटाचा घेतलेला आढावा.
आज मुंबई म्हटले की डोळ्यांसमोर येतात, त्या गगनाला भिडणार्या टोलेजंग इमारती. या गगनचुंबी इमारती म्हणजे मुंबईच्या समृद्धीचे प्रतीक. दिवसागणिक ही महानगरी लाखो लोकांना रोज आपल्यात सामावून घेते. हे लाखो लोक या महानगरीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याची धडपड करतात आणि कळत-नकळत‘या माया’नगरीचाच भाग होतात. ‘देशाची आर्थिक राजधानी’ म्हणून ओळखली जाणारी मुंबई कधीही थांबत नाही. या नगरीचा अकल्पित वेगच या नगरीची खरी ओळख. अशी ही मुंबईनगरी कला, साहित्य, संस्कृतीचा आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे कुतूहलाचा विषय. या सगळ्याच्या पलीकडे मुंबई हा जगण्याचा विषय आहे, हेच शेवटी आपल्या अनुभूतीमधून सिद्ध होते. प्रत्येक गावाचा, शहराचा स्वतःचा स्वतंत्र इतिहास असतो. कालपरत्वे त्या त्या ठिकाणी वेगवेगळी स्थित्यंतरेही बघायला मिळतात. मुंबईच्या ललाटीसुद्धा असाच एक महत्त्वाचा काळ होता, हा काळ नोंदवून ठेवण्याचे काम अशोक राणे यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे.
मुंबईमध्ये नुकतेच ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ पार पडले. या संमेलनाअंतर्गत ज्येष्ठ सिनेसमीक्षक, दिग्दर्शक अशोक राणे यांचा ’आणखी एक मोहेंजोदारो’ हा माहितीपट दाखवण्यात आला. ‘७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’मध्ये ‘नॉन-फिचर श्रेणी’मध्ये सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक मांडणी आणि संकलनाचा पुरस्कार या माहितीपटाला प्रदान करण्यात आला. दिवंगत लेखक जयंत पवार यांनी या माहितीपटाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलला होता. मुंबईचे अभ्यासक नितीन साळुंखे यांनी या माहितीपटासाठी संशोधन केले आहे. अशोक राणे यांनी या माहितीपटाच्या माध्यमातून मुंबईच्या मुळांचा शोध घेतला आहे. सात बेटांनी जोडलेली नगरी, पोर्तुगीजांनी इंग्रजांना हुंड्यात दिलेली मुंबई इत्यादी गोष्टींशी आपण परिचित आहोतच. परंतु, मुंबईच्या मुळांचा शोध म्हणजे मुंबईच्या अस्तित्वाचा शोध आणि तिच्या सांस्कृतिक जाणिवांचा बोध. हे दोन हेतू नजरेसमोर ठेवून या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
सात वाजता सकाळी।
भोंगा वाजवी भूपाळी।
सुरू होते पहिले पाळी। मोठ्या डौलात।
चाक फिरे गरागरा। सूत निघे भरभरा।
नटवाया वसुंधरा। आमच्या घामातून।
नारायण सुर्वे यांनी लिहिलेली ही गिरणीची लावणी. या गिरणीच्या लावणीनेच माहितीपटाची सुरुवात होते. नारायण सुर्वे यांनी आपल्या लेखणीतून कामगारवर्गाच्या वेदनेला वाचा फोडली. गिरणी कामगार आणि मुंबई या द्वयीला एकमेकांपासून वेगळे करणे निव्वळ अशक्य आहे. हाच आशय या माहितीपटामध्ये मोठा होत जातो. इंग्रजांच्या शासनकाळात मुंबईमध्ये गिरण्यांचा जन्म झाला. या गिरण्यांमध्ये फिरणारी चाके, व्यापाराचा वेग वाढवत होती. महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमातींमधील लोक या गिरण्यांमध्ये काम करू लागली.
मानवजातीच्या इतिहासात नदीच्या काठी माणसाने वसाहत उभारली. त्याच प्रकारे या गिरण्यांच्या अवतीभोवती माणसे स्थिरस्थावर होऊ लागली आणि गिरणगावचा जन्म झाला. गिरणगाव जन्माला आले, ते त्याचे स्वतःचे अस्तित्व आणि नशीब घेऊन! ही निर्मिती नेमकी कशी झाली, याचा सुंदर आराखडा या माहितीपटात आपल्याला बघायला मिळतो. संघर्षाच्या रणांगणात मराठी माणूस आपल्याला कायम पुढे दिसून येतो. त्याला अन्यायाची चीड येते. समाजसुधारणेसाठी हा मराठी माणूस सतत प्रयत्नशील असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या या मराठी माणसाने जुलमी व्यवस्थेच्या विरोधात कायम लढा दिला. इंग्रजांच्या शासनात कामगारवर्गाची पिळवणूक होत असे, १६-१६ तास काम करणार्या कामगारांना तुटपुंज्या पगारावर समाधान मानावे लागे. आठवड्याची सुटी मिळावी, यासाठीसुद्धा कामगारांना लढा द्यावा लागला होता आणि या लढ्याचे नेतृत्व केले, नारायण लोखंडे यांनी!
मुंबईच्या या परिवेशात कामगारांचे जीवनमान जसे आकाराला येत होते, त्याच धर्तीवर इथे एका संस्कृतीचासुद्धा जन्म झाला. अठरापगड जाती-जमातींमधील लोकांना एकत्र आणण्याचे काम गिरणगावाने केले. ही सगळी माणसे वेगवेगळ्या प्रांतांतून मुंबईत स्थलांतरित झाली. ते केवळ एकटेच मुंबईत आले नव्हते, त्यांच्या सांस्कृतिक जाणिवासुद्धा त्यांच्यापाशी होत्या. याच जाणिवांच्या मिश्रणातून गिरणगाव समृद्ध झाले. गिरणगावमध्ये जन्मलेल्या चाळसंस्कृतीने मुंबईला वेगळी ओळख दिली. गिरणीच्या कामातील व्यापातून कामगार आपल्या घरी परतल्यावर खर्या अर्थाने एका सुप्त सांस्कृतिक क्रांतीचा जन्म झाला. भगवंताच्या भक्तीत तल्लीन झालेल्या भजनी मंडळांपासून ते कलापथकांच्या निर्मितीपर्यंत गिरणगाव संगीतमय झाले. आज आपण ज्या मराठी रंगभूमीच्या संस्कृतीचे कौतुक करतो, त्या रंगभूमीचा पाया हा कामगार रंगभूमीने घडवला आहे. याच कामगार रंगभूमीने श्रीनिवास नार्वेकर, विजय चव्हाण, विजय कदम असे हरहन्नुरी नट मराठी रंगभूमीला दिले. याव्यतिरिक्त तरुणांची ऊर्जा चांगल्या कामासाठी खर्च व्हावी, यासाठी तयार झालेले आखाडे, त्यात रंगणारे कबड्डीचे सामने, हा सारा प्रवास बघताना गिरणगावच्या सांस्कृतिक वैभवाची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही. कामगारांनी आपल्या कामाच्या पाळीनंतर व्यसनांमध्ये गुंतून पडू नये, म्हणून ‘मनोरंजन मंडळा’ची स्थापना करणार्या नारायण जोशी यांचा विचार किती प्रगतिशील होता, याची प्रचिती आता येते.
गिरणगावमधल्या जीवनाची एक स्वतःची वेगळी लय होती. अशोक राणे यांचे खरे यश हेच आहे की, त्यांना ही लय गवसली. या माहितीपटामध्ये अशोक राणे यांनी माणसांच्या गोष्टी सांगितल्या आणि म्हणूनच त्या गोष्टी काळजाला भिडतात. एका संमिश्र जीवनसंस्कृतीमधून माणसांना जोडणारी परंपरा जन्माला आली. यामध्ये लोकांचा वाद आणि संवाद या दोन्ही गोष्टी ठासून भरल्या होत्या. आपल्या हक्कांसाठी स्त्रियांनी केलेला संघर्ष, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, ही सगळी भूमी बघताना असे लक्षात येते की, आता हा केवळ माहितीपट राहिला नसून, आपल्या समोर जाणिवांचा पट उभा राहिला आहे. भूतकाळातील गिरणगावचे हे वैभव बघताना लक्षात येणारी गोष्ट म्हणजे, हे केवळ स्मरणरंजन नसून, हा आपला वारसा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे, एक असा वारसा जो काळाच्या ओघात मागे पडला.
१९८२ साली मुंबईतल्या गिरणी कामगारांचे आयुष्य बदलणारा तो ऐतिहासिक संप सुरू झाला. त्या संपामुळे गिरणी कामगारांच्या या संस्कृतीचा सूर्यास्त झाला. काळाच्या ओघात गिरण्या बंद पडत गेल्या. लाखो कामगार देशोधडीला लागले. औद्योगिकदृष्ट्या देशात परिवर्तन घडून आले. कामगारांच्या जीवनातदेखील स्थित्यंतर घडून आले. परंतु, या सगळ्या गोष्टी एका क्षणात घडल्या, असा आभास माहितीपट बघताना होतो. वेळेच्या मर्यादेमुळे या स्थित्यंतरावर भाष्य करता आले नाही, असे निदर्शनास येते. भूतकाळातील या सगळ्या सांस्कृतिक वैभावातून एका निराशाजनक वर्तमानात आपण येतो. मुंबईचे स्थित्यंतर गिरणगावच्या कामगाराला मानवले नाही. नागरिकीकरणाच्या न्यायाने मुंबई बदलत गेली. या परिवर्तनाच्या वेगाशी अनेकांना जुळवून घेता आले नाही. काहीतरी खूप मोठी गोष्ट आपण गमावली, परंतु ती गोष्ट नेमकी काय होती, हाच प्रश्न माहितीपटाच्या शेवटी अनुत्तरित राहतो. कारण, अनुभूतीला शब्दबद्ध करणे ही सोपी गोष्ट नसते. मोहेंजोदारोची संस्कृती लयाला का गेली, हा जसा एक अनुत्तरित प्रश्न आहे, अगदी तसाच प्रश्न दिग्दर्शकाने गिरणगावच्या बाबतीत आपल्यासमोर ठेवला आहे. गिरणगाव बदलले, हा बदल नजीकच्या काळातसुद्धा होत राहील. पण, गिरणगावच्या मूळ अस्तित्वाची पुनर्भेट या माहितीपटामुळे होत राहील, हे नक्की!