मुंबई (ओंकार मुळ्ये) : (Shri Ram Navami Shobhayatra Dombivli) डोंबिवली शहराला विशेषतः सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. गुढीपाडवा, दिवाळी, श्रीराम नवमी असे अनेक हिंदू सण-उत्सव आले की, कल्याण-डोंबिवलीतील रस्ते शोभायात्रांना सजून जातात. यानिमित्ताने हिंदू बांधव एकत्र येऊन सण-उत्सव साजरा करताना दिसतात. 'श्रीराम सेवा मंडळ कल्याण शहर'च्या वतीने रामनवमीचे औचित्य साधून याहीवर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा त्यांचे २३ वे वर्ष असून 'श्रीराम नाम सर्वत्र, सर्व हिंदू एकत्र' या संकल्पनेखाली सर्वांना शोभायात्रेत सहभागी होणाचे आवाहन श्रीराम सेवा मंडळ कल्याण शहर कार्याध्यक्ष राजन चौधरी आणि भाजपा कचोरे प्रभागच्या माजी नगरसेविका रेखा चौधरी यांनी केले आहे. रविवार दि. ६/४/२०२५ रोजी सायंकाळी ५ वा. श्री शंकर मंदिर, श्री कृष्ण नगर, पत्रीपुल, कचोरे, कल्याण पूर्व येथून 'श्रीराम रथ यात्रा भव्य मिरवणुक' निघेल. सायंकाळी ६.३० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा व रामजप महायज्ञ व त्यानिमित्त महाप्रसाद असेल.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या मार्गदर्शनातून २००२ सोली सुरु झालेली श्रीराम नवमीची शोभायात्रा आज मोठ्या स्वरुपात नावारुपाला येऊ लागली आहे, ती हिंदू बांधवांच्या वाढत्या सहभागामुळेच. हजारो हिंदू बांधव या शोभायात्रेत दरवर्षी सहभागी होत असतात. सुरुवातीला टिटवाळा, अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली अशा विविध ठिकाणांहून लोक श्रीराम नवमीच्या दिवशी शोभायात्रेत सहभागी होण्याकरीता यायचे. त्यानंतर मंडळातील कार्यकर्त्यांनी पुढे श्रीराम सेवा मंडळाच्या नावाने जागोजागी शोभायात्रा सुरु केल्या. आज शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच होळीनिमित्त विविध उपक्रम, कार्यक्रम, छट पूजा, कावड यात्रा, मातृ-पितृ पूजन, आरोग्य शिबिर, रोजगार संधी उपलब्ध करून देणे, अशी विविध प्रकारची कार्ये मंडळाच्या माध्यमातून केली जातात. कोविडच्या काळातही शहरात मंडळाच्या माध्यमातून झालेले कार्य वाखाणण्याजोगेच होते.
कचोरे गावचा मुंब्रा परिसर होऊ देणार नाही
"वास्तविक कचोरे गावातील जूने अल्पसंख्यांक बांधव हिंदूंसोबत गुण्यागोविंदाने राहायचे, मात्र मधल्या काळात अल्पसंख्याक विस्थापितांची संख्या काही प्रमाणात वाढली. नव्या विस्थापितांनी जून्या लोकांचे ब्रेनवॉश करण्यास सुरुवात केली आणि २०१२-१३ नंतर त्यांच्या कुरघोड्या वाढू लागल्या. आता या लोकांना मुंब्रा सारखा परिसर याठिकाणी करायचा आहे. मात्र आम्ही तसे कदापी होऊ देणार नाही", अशी ठाम भूमिका राजन चौधरी यांनी घेतली आहे.