फिलीपाईन्सचा रामभाव

    05-Apr-2025
Total Views |
Ram Navami Philippines
फिलीपाईन्सच्या ‘महारादिय लावण’ या महाकाव्यात रामकथेचा अद्भुत परिपाठ, स्थानिक संस्कृतीच्या आविष्कारातून अनुभवायला मिळतो. येथे रामचंद्र ‘रादिय मंगनदिरी’ या रूपात तेजस्वी नायक आहेत, तर रावण ‘महारादिय लावण’ म्हणून शक्तिशाली, पण गर्विष्ठ राजकुमार दिसतो. सीतेचे प्रतीक असलेली ‘मलैला’ ही सौंदर्य आणि सद्गुणांची प्रतिमा आहे. अपहरण, संघर्ष आणि धर्म-अधर्म यांच्यातील युद्ध, हे घटनाक्रम या महाकाव्यात विलक्षण लयीत उलगडतात. स्थानिक परंपरा आणि भारतीय पुराणकथांचा अनोखा संगम येथे दिसून येतो, जो सांस्कृतिक भारताच्या समृद्ध वारशाची नव्याने जाणीव करून देतो. भारताचा वारसा नव्या रुपाने जगासमोर आणणार्‍या फिलीपाईन्सच्या रामायणाचे भावपूर्ण विवेचन...
प्राचीन भारतीय संस्कृतीबरोबर साहित्याचाही प्रसार भारताबाहेर झाला, हे सर्वज्ञात आहे. रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये आग्नेय आशियात अतिशय लोकप्रिय झाली. रामायणाविषयी बोलायचे, तर मूळ वाल्मिकी रामायणाची स्थानिक भाषेत भाषांतरे झालीच, पण काही वेळा स्थानिक प्रभावानुसार बदलही झाले. फिलीपाईन्सच्या रामायणाचे यामध्ये वेगळेपण उठून दिसते. मुळात याला रामायण म्हणावे का, असाही प्रश्न पडेल. कारण, याचे नाव आहे रावणावरून आणि घटनास्थळांची व रामासकट इतर पात्रांची नावेही वेगळी आहेत. लक्ष्मण हे ओळखीचे नाव असले, तरीही त्याची व्यक्तिरेखा भिन्नच आहे. तरीही रामायणाशी याचा धागा कसा जोडता येतो, हे पाहणे रंजक आहे.
 
इ. स. 1968 मधे जुआन फ्रान्सिस्को हे फिलीपाईन्समधील एक अभ्यासक, तिथल्या भाषेतल्या संस्कृत घटकांचा अभ्यास करत होते. मिंडानाओ बेटावर लानाओ तळ्याच्या परिसरात राहणार्‍या मारानाव (मेरनाव, मारानाओ) लोकांकडून त्यांनी ’महारादिय लावण’ अर्थात ‘महाराज रावण’ ही कथा ऐकली. मग मारानाव भाषेचे विद्वान आणि शब्दकोश यांच्या मदतीने, त्याचे इंग्रजीत भाषांतर करून हा ठेवा जगासमोर आणला. त्यांच्या मते, 17व्या ते 19व्या शतकादरम्यान, रामकथा फिलीपाईन्समध्ये पोहोचली असावी.
 
फिलीपाईन्सच्या रामायणातील कथा
 
पुलु बन्दिआर्मसिरच्या सुलतानाचा मुलगा लावण हा या कथेचा नायक. त्याला जन्मतःच आठ डोकी होती. या विचित्र मुलाच्या तशाच विचित्र वागण्यामुळे प्रजा त्रस्त झाल्याने, वडील त्याला पुलु नगरला पाठवतात. तिथे एकांतात तो अल्लाची उपासना करतो. मोहमायेच्या पाशात जखडलेल्या जगाला मुक्तता मिळावी, म्हणून अग्नीत प्रवेश करून आत्मबलिदान करण्याचे ठरवतो. दियाबराईल अर्थात गॅब्रिएल देवदूत अल्लाला याविषयी सांगतो. अल्ला म्हणतो, त्याला आगीने काहीही होणार नाही. सुलतानाच्या महालातल्या विशिष्ट दगडावर घासून धारदार केलेल्या तलवारीनेच त्याचा मृत्यू होऊ शकतो. देवदूत लावणाला वडिलांकडे परत जाण्यास सांगतो. त्याची बदललेली वागणूक पाहून लावणाच्या वडिलांना आनंद होतो.
 
इकडे आगम निओग राज्यात, रादिय मंगनदिरी आणि रादिय मंगवर्ण नावाचे दोन भाऊ असतात. पुलु नबंदाईची राजकन्या तुवान पुत्री मलैला (मालानो) तिहैया (गंडिंग) हिला मिळवण्यासाठी ते प्रयत्न करण्याचे ठरवतात. दहा वर्षे पुरेल असा अन्नधान्य व इतर गोष्टींचा साठा, भेटवस्तू घेऊन ते नौकेतून निघतात. दुर्दैवाने वादळात नौका फुटते, पण ते कसेबसे किनार्‍याला लागतात. कबैयन नामक वृद्धा त्यांची सेवा शुश्रुषा करते. तिच्याकडून त्यांना राजकन्येच्या स्वयंवराविषयी समजते. जो कोणी वेताचा चेंडू पायाने राजकन्येच्या महालात फेकेल, त्याच्याशी तिचा विवाह होणार असतो. ‘शिप-सिप’ नामक हा क्रीडाप्रकार असून, हा खेळ आजही तिथली लहान मुले खेळतात. हे दोघे भाऊ याच खेळाचा सराव करतात आणि मंगनदिरी यात यशस्वी होतो. राजकन्या कातरलेली सुपारी, आपली अंगठी, पानाचा डबा स्वतःच्या रुमालात बांधून चेंडूसोबत खाली फेकते. मंगनदिरी कातरलेली सुपारी विखरून टाकतो आणि बाकीच्या वस्तू पुरावा म्हणून ठेवतो. आलेले इतर राजपुत्र ते तुकडे गोळा करतात आणि आपणच जिंकल्याचा दावा करीत भांडतात. सुलतान इतर पुरावे मागतो. प्रत्येकजण तशा दुसर्‍याच वस्तू घेऊन येतो; पण राजकन्या नाकारते. शेवटी मंगनदिरी, त्याच्याकडील गोष्टी दाखवून खात्री पटवतो. पण, सुलताना म्हणते, त्याने अजून एक काम करायला हवे. डोंगरावरचा महाकाय सर्प रोज सूर्यप्रकाश अडवतो; जर त्याला मारले तरच त्याच्याशी राजकन्येचा विवाह होईल. दोघे भाऊ डोंगरावर जातात. झोपलेल्यावर वार करू नये, म्हणून सर्पाला उठवतात आणि एकाचवेळी त्याच्या दोन्ही डोळ्यांत बाण मारून त्याला ठार करतात. मग थाटामाटात विवाह होतो. सुलतान भरपूर संपत्ती, नोकर, पालखी देऊन पाठवणी करतो.
 
वाटेतला रमणीय प्रदेश पाहून ते ठरवतात की, तांदूळ व मक्याची शेती करून पुरेसे पीक बरोबर घेऊनच मग आपल्या राज्यात परतायचे. पिकाची पाहणी करताना, मलैला सोनेरी शिंगांचे एक हरीण बघते. तिच्या हट्टाखातर मंगनदिरी त्याला पकडायला त्याच्या मागे जातो आणि मंगवर्णला तिच्या रक्षणार्थ ठेवतो. हरीण पळून जाण्याऐवजी त्याच्याशी लढू लागते. म्हणून मंगनदिरी मंगवर्णला हाक मारतो. आवाजाने घाबरून मलैला मंगवर्णला मदतीसाठी पाठवते. पण, मंगवर्णला मलैला म्हणतो, “मी जातो, पण तू दारे-खिडक्या नीट लावून घे; कुणी टकटक केले, तरी अजिबात उघडू नकोस.” त्याला येताना पाहून, हरीण अजून एक हरीण उत्पन्न करते. नकळत दोघे भाऊ दोन हरणांमागे विरुद्ध दिशेला जातात. पाठलाग करता करता, मंगवर्ण घराजवळ पोहोचतो. घर उद्ध्वस्त झालेले असते. आजूबाजूच्या स्त्रिया रडत सांगतात की, लावणाने मलैलाला पळवले.
 
हे ऐकताच तो मंगनदिरीला शोधायला जातो. तो बेशुद्धावस्थेत नदीजवळ सापडतो. शुद्धीवर आल्यावर सांगतो की, मला खूप विचित्र स्वप्न पडले-एका पाणरेड्याने मला जखमी केले आणि माझा एक अंडकोष उडून पूर्वेकडे पडला. तिथली राणी पुत्री लंगावी हिने तो मौल्यवान मणी समजून गिळला. ती गरोदर राहिली आणि तिने लक्ष्मण नामक एका मर्कटपुत्राला जन्म दिला. तो चाचपून बघतो, तर खरेच एक अंडकोश नसतो. मंगवर्ण मलैलाला लावणाने पळवल्याचे मंगनदिरीला सांगतो. आता काय करायचे? कुणाची मदत मिळवायची? असा ते विचार करू लागतात.
 
तिकडे लक्ष्मण मोठा होऊन पित्याविषयी आईला विचारतो. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, पित्याच्या शोधात निघतो. झाडांवरून उड्या मारता मारता नेमका या दोघांच्या पुढ्यात उभा राहतो. त्यांना वडील व काका म्हणून हाकही मारतो. तो भेटल्यावर आपण स्वप्न पाहिले नसून, हे सर्व खरेच घडल्याची मंगनदिरीची खात्री पटते. लक्ष्मण त्यांना धीर देऊन आपण मदत करणार असल्याचे सांगतो. तो पाणम्हशी, रेडे आणि वानरांची मोठी सेना उभी करतो. मंगनदिरीच्या तळव्यावरून झेप घेऊन, लक्ष्मण लावणाच्या राजवाड्यात जाऊन बघून येतो. लावणाने मलैलाजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास, अचानक दोघांच्या मध्ये अग्नी प्रकट होत असल्याचे सांगून तिच्या सुरक्षिततेची ग्वाही देतो.
 
महाकाय वेलींचा व बांबूंचा सेतू बांधून, ते त्यावरून जाऊ लागतात. सेतू हेलकावल्याने ते पाण्यात पडतात आणि पाण्यातल्या मगरी त्यांच्यावर हल्ला करतात. लक्ष्मण त्यांना हरवून, राजाकडून मदतीचे आश्वासन घेतो. शेवटी लावणाशी युद्ध सुरू होते. दोघे भाऊ आलटून पालटून त्याच्याशी लढत असतात. पण, विजयाचे चिन्ह नसते. लक्ष्मण चपळाईने महालात घुसून, तलवारीला त्या विशिष्ट दगडावर घासून घेऊन येतो. मंगवर्ण त्याच तलवारीने वार करतो आणि लावण कोसळतो. जे घाबरून पाण्यात उड्या टाकतात, त्यांना मगरी ठार करतात. मग मलैलासह तिघे मगरांच्या राजावर बसून, आगम निओगला परततात. इतर लोक बाकीच्या मगरींवर स्वार होतात. पाणी खळबळवत येणार्‍या अनेक मगरी आणि पाणम्हशींच्या चालण्याने, कंप पावणारी जमीन बघून प्रजाजन घाबरतात.
 
 
पण लक्ष्मण समजावून सांगतो आणि सगळ्यांची ओळख पटवतो. त्यानंतर लक्ष्मणाचे एका देखण्या युवराजात रूपांतर होते आणि सर्वांना आनंद होतो.
 
मौखिक परंपरेने ही भन्नाट कथा पिढ्यान्पिढ्या सांगितली गेली आणि आजही मारानाव लोकांची आवडती आहे. वाल्मिकी रामायणाशी तुलना केल्यास, एकाहून अधिक तोंडांचा रावण, राजकन्येचे स्वयंवर, मायावी कांचनमृग, कपटाने दुसर्‍याच्या पत्नीचे अपहरण, वानरांची सेना अशी काही मोजकीच साम्यस्थळे दिसतात. ठळक फरक मात्र अनेक आहेत.
 
मंगनदिरी, मंगवर्ण, मलैला यांचा जन्म कसा झाला? त्यांचे आईवडील कोण? मलैलाला का पळवले? लावणाचे पुढे नेमके काय झाले? रेड्याने का हल्ला केला? लक्ष्मण लगेच मोठा होऊन, नेमका वडील व काकाला कसा ओळखतो? असे अनेक प्रश्न मात्र, कथेत अनुत्तरितच राहतात.
 
मूळ रामायणात हे असे अनाकलनीय बदल कसे घडले असावेत?
 
प्राचीन काळात फिलीपाईन्सचा भारताशी थेट संपर्क नव्हता. पण, 14व्या शतकापासून, जावाच्या मजपहित आणि सुमात्राच्या श्रीविजय राजवटींशी व्यापारी संबंध होते. त्यामुळे भारतीय संस्कृतीशी अप्रत्यक्षरित्या ओळख झाली. हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्मांचा मिश्र प्रभाव पडला. फिलीपाईन्स हे बेटांचे राज्य असल्याने चीन, तैवान, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम यांच्याशी सागरी सीमा सामायिक आहेत. म्हणून तिथे अनेक संस्कृतींचा प्रभावही आहेच. स्थानिक संकल्पनांचाही त्यात वाटा आहेच. नंतर इस्लामीकरण झाल्यावर अल्ला, सुलतान अशा गोष्टींची कथेत भर पडली असावी. त्यामुळे मूळ कथेपासून भरकटत गेलेली, अशी ही वेगळीच कथा तयार झाली.
 
मलय भाषेतल्या ‘हिकायत सेरी राम’ आणि ‘हिकायत महाराज रावण’ या दोन कथा, तुलनेने रामायणाशी अधिक जुळणार्‍या आहेत. पण त्या फिरत फिरत इथे आल्याने, कानगोष्टीसारखे त्यांचे रूप बदलले असावे. रामाच्या वानर रूपातल्या पुत्राचा उल्लेख मलय रामायणातही आहे; फक्त संदर्भ वेगळा आहे. मलय भाषेत ‘लक्ष्मण’चा अर्थ ‘सेनाधिपती’ असा असल्याने, तेच नाव त्याला दिले असावे. ‘आगम निओग’ आणि ‘बंदिआर्मासिर’ या नावांचा संदर्भ मात्र लागत नाही; अगदी जुन्या मलय किंवा जावा साहित्यातसुद्धा नाही. ‘र’चा ‘ल’ होणे मात्र खूप स्वाभाविक आहे. लाहू (राहू), लस (रस), कस्तुली (कस्तुरी) असे अनेक शब्द त्यांच्या तागलोग भाषेत आहेत. रावणाचा लावण तसाच झाला असावा.
 
फ्रान्सिस्कोंच्या मते ‘दरंगेन’ या स्थानिक काव्याचा सखोल अभ्यास केल्यावर अनेक कोडी उलगडतील. या 17 भागांच्या आणि 72 हजार ओळींच्या ‘दरंगेन’चा अगदी छोटा भाग, ‘सिंगकिल’ नृत्यात आजही सादर केला जातो. राजपुत्र बान्टुगन राजकन्या गंडिंगच्या शोधात असताना, जंगलातील दिवतांमुळे भूकंप होऊन झाडे आडवीतिडवी पडून राजकन्या अडकते. राजपुत्र बान्टुगन तसाच वाट काढत जातो व तिला मिळवतो. राजपुत्राच्या हातात ढाल-तलवार असते, तर राजकन्या पंख्यांची जोडी हलवत नृत्य करते. तिच्या पायांतल्या घंटांसारख्या घुंगरांमुळे ‘सिंगकिल’ हे नाव आहे. यात कलाकार एका लयीत हलणार्‍या उभ्या-आडव्या बांबूंना चुकवत नृत्य करतात. सीतेच्या शोधात भटकणार्‍या रामाशी, याचे साम्य निश्चित जाणवते. या काव्याच्या संशोधनातून फिलीपाईन्सच्या रामकथेचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल, अशी आशा करायला हरकत नाही.
 
 डॉ. नीलिमा थत्ते
(लेखिका वैद्यकीय पदवीधर असून भारतीय विद्या व संस्कृतच्या अभ्यासक आहेत.)
9850095092