भाजप एका विधानसभेत नेमणार ३ मंडल अध्यक्ष

    05-Apr-2025
Total Views |
 
BJP
 
मुंबई : एका विधानसभेसाठी असलेल्या एका अध्यक्षाऐवजी आता भाजपतर्फे तीन मंडल अध्यक्ष नेमण्यात येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या पदाकरिता ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे.
 
आजघडीला संख्याबळाच्या दृष्टीने भाजप देशासह राज्यात सर्वात मोठा पक्ष बनला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपचे सर्वाधिक १३२ आमदार निवडून आलेत. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा बिगुल वाजेल. विधानसभा निवडणूकीतील अभूतपूर्व यशानंतर पुन्हा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टीने भाजपकडून स्थानिक पातळीवर काही बदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
 
हे वाचलंत का? -  प्रभू श्रीरामांचे जीवन म्हणजे जीवन मूल्यांचा सर्वोच्च बिंदू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
३५ ते ४५ वर्षे वयोगटातील कार्यकर्त्यांची वर्णी!
 
सध्या एका विधानसभेसाठी एक मंडल अध्यक्ष अशी रचना असून ही संख्या वाढवणार असल्याचे कळते. आता एका विधानसभा क्षेत्रासाठी आवश्यकतेनुसार दोन किंवा तीन प्रभागांकरिता प्रत्येकी एक मंडल अध्यक्ष नेमण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मंडल अध्यक्ष नेमताना आतापर्यंत वयाची अट नव्हती. परंतू, आता ३५ ते ४५ वयोगटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मंडल अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे समजते. तसेच ४५ वर्षांवरील अध्यक्षांना या पदावरून बाजूला केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये एका विधानसभा क्षेत्रात तीन मंडल अध्यक्ष असतील. येत्या ११ किंवा १४ तारखेला याबाबतचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.