नवी मुंबईत ‘किंग कोब्रा’ची तस्करी?

‘आंतरराष्ट्रीय इन्फ्लुएन्सर’चा व्हिडिओ समोर

    04-Apr-2025
Total Views |

King Cobra being smuggled into Navi Mumbai
 
नवी मुंबई: ( King Cobra being smuggled in Navi Mumbai ) भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने नवी मुंबईतील काही बोगस सर्पमित्रांच्या मदतीने रबाळे येथे सापांसोबत बेकायदा खेळ केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यामधील आता एका इन्फ्लुएन्सरने घणसोलीमध्येच किंग कोब्रा हाताळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. त्यामुळे या इन्फ्लुएन्सरना दाखविण्यासाठी या बोगस सर्पमित्रांनीच ‘किंग कोब्रा’ या वाघासारख्या अत्यंत संरक्षित सापाची बाहेर राज्यातून नवी मुंबई परिसरात तस्करी केली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
दि. १५ मार्च रोजी रबाळे येथील कांदळवन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय इन्फ्लुएन्सर माईक हॉल्सटन आणि मिकाएल अपॅरिसियो हे स्थानिक सर्पमित्रांसह जमले होते. सर्पमित्रांना या दोन्ही इन्फ्लुएन्सरना नाग हाताळण्यासाठी दिला. या दोन्ही इन्फ्लुएन्सरने या सापांसोबत खेळ करून त्याचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर प्रसारित केले. त्यामुळे सर्पमित्रांनी हा नाग कुठून पकडला? आंतरराष्ट्रीय इन्फ्लएन्सरकरिता स्थानिक सर्पमित्रांनी या सापाला पकडले होते का? नागाला हाताळण्याची परवानगी कोणी दिली, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले होते. या संदर्भातील तक्रार प्राणिमित्र आनंद मोहिते यांनी ठाणे वन विभागाकडे केली होती. मात्र, आता या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले आहे.
 
मिकाएल अपॅरिसियो याने आपल्या सोशल मीडियाद्वारे किंग कोब्रा हाताळत असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ रबाळे येथे छायाचित्रित केला असल्याचा दावा मोहिते यांनी केला आहे.
 
किंग क्रोबा हाताळणार्‍या व्हिडिओमध्ये दिसणारा परिसर हा पूर्वी नाग हाताळताना व्हिडिओमधील परिसरासारखाच आहे. त्यामुळे नवी मुंबईतील हौशी सर्पमित्रांनी हा किंग कोब्रा कुठून आणला? याविषयी वन विभागाने चौकशी करावी, अशी मागणी मोहिते यांनी केली आहे. या संदर्भातील तक्रारदेखील ते वन विभागाकडे दाखल करणार आहे. दरम्यान, “नाग हातळण्याच्या प्रकरणासंबंधी आम्ही नवी मुंबईतील त्या सर्पमित्रांना बोलावून चौकशी करीत आहोत,” अशी माहिती ठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश देसले यांनी दिली.