काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशामध्ये जनक्षोभाचा आगडोंब उसळला. सातत्याने भारताच्या संयमाचा उपमर्द करणार्या पाकिस्तानला धडा शिकवण्याबाबत जनतेचा एकसूर देशात उमटला. मात्र, असे असले तरीही पहलगामसारखे हल्ले हे एका मोठ्या सापळ्याचा भाग असू शकतात. त्यामुळे, भारत सरकारला जनमताबरोबर देशहिताचा विचार करणे क्रमप्राप्त असते.
पहलगाम येथील अमानुष दहशतवादी हल्ल्यामुळे, भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ज्याप्रकारे पर्यटकांमधून हिंदूंना वेगळे काढण्यात आले आणि त्यांच्यापैकी, केवळ पुरुषांना ठार मारण्यात येऊन त्यांच्या कुटुंबीयांना आयुष्यभर ते दुःख सोसण्यासाठी जिवंत सोडण्यात आले, त्याच्या कहाण्या ऐकून केवळ देशातच नाही, तर जगभरामध्येही संतापाची लाट आली आहे. 1971 सालच्या बांगलादेशनिर्मिती युद्धामध्ये दारुण पराभव झाल्यानंतर, दहशतवाद हे पाकिस्तानच्या भात्यातील सर्वांत प्रभावी शस्त्र ठरले.
पंजाब तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांना मदत करणे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ निर्माण करून तेथून भारतात हल्ले करणे, भारतात हिंदू विरुद्ध मुस्लीम आणि त्यापूर्वी शीख यांच्यामध्ये निर्माण झालेली दरी वाढवून त्याचे वैरात रूपांतर करण्याचे प्रयत्न करणे, तसेच नेपाळ आणि बांगलादेशात भारताच्या सीमेवर, मदरशांच्या माध्यमातून भारतविरोधी कारवाया करणे, अशा गोष्टी गेली 55 वर्षे अखंड सुरू आहेत. यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेले हल्ले, मुख्यतः तेथे आलेल्या तीर्थयात्रेकरूंविरुद्ध होते. काही तुरळक अपवाद वगळता, काश्मीर खोर्यात आलेल्या पर्यटकांना लक्ष्य केले जात नव्हते. काश्मीरमधील पर्यटनाच्या क्षेत्रात हॉटेल, शिकारे, घोडेवाले तसेच वाहतूक व्यवस्थेत फुटीरतावाद्यांचेही पैसे गुंतले असल्याने तसेच, त्यामुळे स्थानिक काश्मिरी लोकांना रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे, अशा गोष्टींना उघडपणे पाठिंबा दिला जात नव्हता.
मग एप्रिल 2025 मध्ये नेमके काय बिनसले किंवा घडले, जेणेकरून पहलगाममध्ये इतका मोठा हल्ला केला गेला. त्यातही पर्यटकांना धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली? काश्मीरमधील स्थानिक लोकांना आपण भारतीय असण्याचा अभिमान नसला आणि अन्य भारतीयांबद्दल फारशी सहानुभूती नसली, तरी त्यांनाही आपली रोजीरोटी प्रिय आहेच. अगदी फुटीरतावादी लोकांचाही रोजगार पर्यटनाशी निगडीत आहे. या घटनेमुळे किमान या हंगामातील पर्यटनाचा रोजगार ठप्प झाला असल्यामुळे, काश्मिरी जनता या हल्ल्याचा निषेध करायला घराबाहेर पडली. त्यामुळे पाकिस्तानचा या हल्ल्यामागचा नेमका हेतू काय? हे समजणे आवश्यक आहे.
देशातील सर्वधर्मसमभाव आणि मतपेढीची काळजी असणार्यांनी त्यांच्या परीने या घटनेचे विश्लेषण करताना, पाकिस्तानी लष्कराला भारतात हिंदू-मुस्लीम विभाजन करायचे असल्यामुळे त्यांनी हा हल्ला घडवून आणला, असा शोध लावला. प्रथमदर्शनी हा तर्क पटण्यासारखा आहेच. पण, असे असेल तर ही गोष्ट यापूर्वी का केली नाही, याचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या अन्य बाजूही तपासाव्या लागतात. तसे करायचे, तर पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
पाकिस्तानच्या गेल्या 77 वर्षांच्या इतिहासात, बहुदा दुसर्यांदाच पाकिस्तानच्या लष्कराची विश्वासार्हता तळाला गेली आहे. असे म्हटले जाते की, बहुतेक देशांकडे सैन्य असते, पण पाकिस्तानात सैन्याकडे देश आहे. 1971 साली बांगलादेशनिर्मिती युद्धात, पाकिस्तानच्या लष्कराची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेली होती. त्याचा फायदा घेऊन, झुल्फिकार अली भुत्तोंनी सत्ता मिळवली आणि लष्कराला बराकीत पाठवले. पहिले अध्यक्षपद आणि नंतर पंतप्रधानपद भूषवणार्या भुत्तोंना, जेमतेम सहा वर्षे सत्ता उपभोगता आली. 1977 सालच्या निवडणुकीत विजय मिळवूनही, पाकिस्तानच्या लष्कराने बंड केले आणि सत्ता ताब्यात घेऊन भुत्तोंना फासावर लटकवले.
आज बलुचिस्तानच्या बर्याचशा भागावर पाकिस्तानच्या लष्कराचे नियंत्रण नाही. बलुचिस्तानचे क्षेत्रफळ, पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाच्या 43.6 टक्के आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये ‘तहरीक-ए-तालिबान’ने मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले करून, पाकिस्तानी लष्कराला हैराण केले आहे. एका अहवालानुसार, गेल्या वर्षी पाकिस्तानमधील अंतर्गत बंडाळी आणि फुटीरतावादी संघटनांशी लढताना, 754 सैनिक आणि पोलीस मारले गेले. एकेकाळी तालिबानला हाताशी धरून भारताविरुद्ध सक्रिय करण्याची स्वप्ने बघणार्या पाकिस्तानी लष्कराला, आज अफगाणिस्तानमधील तालिबान आणि पाकिस्तानमधील ‘तहरीक-ए-तालिबान’ युतीचा सामना करावा लागत आहे.
‘तहरीक’चे लोक पाकिस्तानमध्ये हल्ला करून, अफगाणिस्तानमध्ये आसरा घेतात. पाकिस्तानच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पंजाबमध्ये, आजही अनेक लोकांचा इमरान खानला पाठिंबा आहे. इमरान खान भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गेली दोन वर्षे तुरुंगात आहे. पाकिस्तानच्या लष्कराने गेल्या निवडणुकीत इमरान खानच्या पाकिस्तान ‘तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाच्या उमेदवारांना पक्षाच्या नाव आणि चिन्हावर निवडणूक लढायला विरोध केला, तरीही त्यांचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले. परदेशात राहणार्या पाकिस्तानी लोकांचा आजही इमरान खानना पाठिंबा असून, त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशात तेथील जनमताला प्रभावित करण्यासाठी आपली आर्थिक ताकद लावली आहे.
हे घडत असताना, पाकिस्तानवरील आर्थिक संकट अधिकाधिक गडद होत चालले आहे. गेली तीन वर्षे महागाईने कंबरडे मोडल्यावर, आता आर्थिक मंदीचे सावट आले आहे. पाकिस्तानचा रुपया गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडासा सावरला असला, तरी भारतीय रुपयाच्या तुलनेत त्याचे मूल्य 3 रुपये, 30 पाकिस्तानी पैसे इतके आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने पाकिस्तानविरुद्ध 29 टक्के आयातशुल्क लावले आहे. त्याहून वाईट बातमी म्हणजे, अमेरिका विरुद्ध चीन या व्यापारी युद्धामध्ये पाकिस्तान चीनची साथ सोडू शकत नाही. या युद्धामध्ये कोणाचीही सरशी झाली, तरी जागतिक व्यापाराची आणि त्यातही चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिकेची हानी झाली आहे. चीन पाकिस्तानला वार्यावर सोडणार नसला, तरी त्याचे पाकिस्तानमधील आर्थिक हितसंबंध संपल्यात जमा आहे.
नाका तोंडात पाणी जायला लागल्यावर पाकिस्तानी लष्कराने हा जुगार खेळला असावा, अशी शंका आहे. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना दुखावून जर भारतासोबत मर्यादित सशस्त्र संघर्ष झाला, तर त्यात अमेरिका किंवा चीन उतरण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात डोनाल्ड ट्रम्प आपल्या पहिल्या अधिकृत परदेश दौर्यानिमित्ताने, सौदी अरेबियाला जाणार आहेत. पहलगाम हल्ला झाला, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वान्स हे भारतात होते, हा योगायोग नव्हता. पाकिस्तानला माहिती आहे की, पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत लष्करी कारवाई करणार. ही कारवाई आपल्याला अमेरिका किंवा चीनकडून मध्यस्थीची संधी देईल, अशी पाकिस्तानला खात्री आहे.
अमेरिकेला चीनविरुद्ध व्यापार आणि तंत्रज्ञान युद्धामध्ये यशस्वी होण्यासाठी, तसेच हिंद-प्रशांत क्षेत्राच्या सुरक्षेसाठी भारताची गरज आहे. त्यामुळे अमेरिका, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाचे युद्धात रूपांतर होणार नाही, यासाठी प्रयत्न करेल. तसे न झाल्यास आणि भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर तसेच, त्यांना रसद पुरवल्या जाणार्या ठिकाणांवर हल्ला केला, तर ते चीनच्या पथ्यावर पडणार असल्यामुळे अशा परिस्थितीत चीन पाकिस्तानला बुडू देणार नाही, अशी खात्री पाकिस्तानच्या लष्कराला असावी. ‘उरी’ हल्ल्यानंतर केलेले सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्यानंतर केलेले हवाई हल्ले यामुळे, भारतामध्ये पाकिस्तानला अद्दल घडवणारी कारवाई केली जावी, यासाठी जनमताचा दबाव आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील मधुबनी येथे बोलताना तसेच ‘मन की बात’ या आपल्या मासिक जनसंवाद कार्यक्रमात, त्याबाबतचा निर्धार व्यक्त केला आहे. भारत पाकिस्तानला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, असा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनाही विश्वास आहे. मोदी सरकारला भारतीय लोकांच्या मनातील क्षोभ थोडा शांत करताना, पाकिस्तान आणि कदाचित चीनने रचलेल्या सापळ्यात आडकणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.