नवी दिल्ली : (Pakistan Cyber Attack) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सायबर सुरक्षेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाकिस्तानी हॅकर्सकडून भारताच्या सायबरस्पेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यात पाकिस्तानला अपयश आले आहे.
आयओके म्हणजेच इंटरनेट ऑफ खिलाफा या नावाने काम करणाऱ्या हॅकर्सच्या एका गटाने भारताच्या महत्त्वाच्या वेबसाईट खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन सेवा खंडीत करण्याचा आणि वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा गट पाकिस्तानातून कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये दोनवेळा सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, भारताच्या मजबूत सायबर सुरक्षा प्रणालीमुळे पाकिस्तानला यामध्ये अपयश आले आहे.
श्रीनगरमधील आर्मी पब्लिक स्कूल आणि एपीएस राणीखेत च्या संकेतस्थळावर भडकाऊ प्रचार करण्याचा प्रयत्न झाला. तसेच एपीएस श्रीनगरच्या वेबस्टाईटही हॅक करण्याचा प्रयत्न झाला. आर्मी वेल्फेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशनची माहिती चोरण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे.याशिवाय, इंडियन एअर फोर्स प्लेसमेंट ऑर्गनायझेशन पोर्टल हॅक करण्याचाही एकाच वेळी प्रयत्न करण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळताच तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे कोणतीही मह्त्त्वाची माहिती चोरली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\