अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते 'कॉल हिंदू' डिजिटल व्यासपीठाचे उदघाटन
30-Apr-2025
Total Views | 6
मुंबई, ३० एप्रिल : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात 'कॉल हिंदू' नामक एका खाजगी डिजिटल व्यासपीठाचे उदघाटन करण्यात आले. याद्वारे हिंदू समाजासाठी रोजगार, ई-कॉमर्स, ऑनलाईन विवाह संस्था यासारख्या विविध सेवा पुरवण्यात येणार आहेत. हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते विशाल दुराफे यांच्या संकल्पनेतून सदर डिजिटल व्यासपीठ साकारत असून, आज त्याच्या वेबसाईटचे उदघाटन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. आज या वेबसाईटच्या माध्यमातून कॉल हिंदू जॉब्स या सेवेची सुरुवात करण्यात आली असून हिंदू तरुणांना रोजगार आणि हिंदू व्यावसायिकांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याचा उद्देश या माध्यमातून साध्य होणार आहे.
याबाबत बोलताना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, "कॉल हिंदू या डिजिटल उपक्रमाचे उद्घाटन करताना मला अत्यंत आनंद होत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजाची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती शक्य होते. या पुढाकारासाठी निर्मात्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या उपक्रमामार्फत तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी सरकार म्हणून आम्ही सहकार्य करू. कौशल्य विकास विभाग विविध माध्यमांच्या मदतीने तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे, आता या सोबत कॉल हिंदू व्यासपीठाचा देखील वापर करू."
या वेबसाइटच्या माध्यमातून रोजच्या जीवनाशी निगडित विविध सेवा प्रदान करण्यात येणार आहेत. यात राष्ट्रभक्तीला समर्पित माहिती व उपक्रम, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, घरबसल्या मंदिरांचे दर्शन घेता येईल अशी सेवा तसेच समाजाभिमुख ई-कॉमर्स आणि स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणारे डिजिटल बाजार यांचा समावेश आहे. विवाह जुळवण्यासाठी एक विशेष विभाग आहे तसेच कुटुंबासोबत धार्मिक स्थळांना सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाच्या योजना आखणे या वेबसाईटच्या माध्यमातून शक्य होणार आहे. आज रोजगार विषयक सेवा सुरु झाली असून लवकरच इतर सेवा सुद्धा लोकांना वापरायला मिळणार आहेत. पुढच्या टप्प्यात लवकरच याचे अप्लिकेशन तयार होणार आहे.