अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

03 Apr 2025 10:41:10

waqf amendment bill passed in lok sabha
 
 
नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Passed in Lok Sabha) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी बुधवार दि. २ एप्रिल रोजी बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. सभगृहात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पुढे दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या दीर्घकाळ चर्चेनंतर झालेल्या मतदानामधून अखेरीस वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत.
 
लोकसभेत यावर १२ तासांपेक्षा अधिक वेळ चर्चा झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी आरोप प्रत्यारोपांमधून आपआपली भूमिका सभागृहापुढे मांडली. चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्षांच्या खासदारांनी विधेयकाचे समर्थन केले तर विरोधी बाकावरील खासदारांनी या विधेयकाला असंवैधानिक असल्याचे सांगत कडाडून विरोध केला. यावेळी सभागृहात चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाने वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान केले. दरम्यान एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या विधेयकाला विरोध करताना विधेयकाची प्रत सभागृहात फाडली. यावर सत्ताधारी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला.
 
वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर आता हे विधेयक आज राज्यसभेत सादर केले जाणार आहे. हे विधेयक लोकसभेत पारित होणे हे केंद्रातील मोदी सरकारसाठी मोठे यश मानले जात आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर आता ठराविक समुदायामध्ये सरकारविरुद्ध वातावरण निर्माण करुन स्वत:चे राजकीय मनसुबे पूर्ण करण्याचे विरोधी पक्षाचे प्रयत्न यापुढे यशस्वी होणार नाहीत, हे मात्र नक्की.
 
 
Powered By Sangraha 9.0