जंगल देव आहे, असे मानून त्याला वणव्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणार्या दिनेश गणपत मेघे यांच्याविषयी...
सर्गाला देव मानणारा समाज आजही आपल्यासोबत जगत आहे. या निसर्गपूजक समाजाने आजही जंगलाशी असलेली आपली धार्मिक आस्था जपली आहे. असाच एक निसर्गप्रेमी, ज्याला वणव्याने पेटलेले जंगल दिसले की, याचा उर भरून येतो आणि लागलीच त्याची पाऊले त्या वणव्यावर मात करण्यासाठी वळतात. असा हा वणवा दिसता क्षणी, तो 100 टक्के विझवणारा माणूस म्हणजे दिनेश मेघे!
दिनेश यांचा जन्म भिवंडी तालुक्यातील देवराई देवचोळ या गावात दि. 26 मार्च 1987 रोजी झाला. त्यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. आईवडील मोलमजुरी करून घर चालवत असत. शिक्षणाची गोडी असणार्या दिनेश यांनी आपले शालेय शिक्षण गावातच पूर्ण केले. त्यानंतर खर्डी महाविद्यालयामधून कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. शालेय जीवनात असताना त्यांना आसपासच्या भागात होणारी जंगलतोड सतावत असे. जंगलात फिरायला गेल्यावर त्यांना जंगलतोड करणारी मंडळी ओरडायचे, जंगलात फिरण्यापासून रोखायचे, विरोध करायचे. मात्र, या विरोधाला न जुमानता या मुलांनी जंगलतोड करणार्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान दिनेश यांनी जंगलतोड रोखण्याचे काम सुरूच ठेवले. त्यावेळी त्यांना वन विभागाची साथ मिळाली. ‘सामूहिक वन हक्क दावा’ दाखल झाल्यानंतर वनजमीन मिळाली. त्यामुळे दिनेश यांच्या कुटुंबाने आपले बस्तान जंगल भागातच हलवले आणि जंगल सांभाळायला सुरुवात केली.
जंगलात राहू लागल्यानंतर दिनेश यांना वनवणव्याची समस्या लक्षात आली. काही लोक शिकार किंवा लाकूडतोडीसाठी जंगलांना वणवा लावत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जंगल सांभाळायचे म्हणजे त्यामधील समस्यांवरदेखील आपणच मार्ग काढायचा, या उद्देशाने दिनेश यांनी वणवा निर्मूलनाच्या कामाला सुरुवात केली. त्यांचे गाव टेकडीवर असल्यामुळे आसपासच्या भागात लागणारे वणवे सहज दिसायचे. हा भाग तसा ओसाड, माळरानासारखा. त्यामुळे वणवा पसरण्याचा वेग अधिक. वणवा लागलेला दिसला की, दिनेश त्याठिकाणी धाव घ्यायचे. सुरुवातीच्या काळात वणवा विझवण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची साधनसामग्री नव्हती. त्यामुळे ताडाच्या झाडाच्या झावळ्या वापरून वणवा विझवण्याचे ते काम करत असत. मात्र, वन विभागाला या कामाची माहिती मिळाल्यावर त्यांनी दिनेश यांना वणवा विझवण्याचे मशीनच उपलब्ध करून दिले. आता दिनेश याच मशीनच्या मदतीने लागलेले वणवे तातडीने विझवतात. वणवा लावणार्यांना समजत नाही की, वणव्यामुळे संपूर्ण जंगलच पेटत नाही, तर अनेक पशू-पक्षी, कीटक, प्राणी, झाडे-झुडपे जळून नष्ट होतात. “जसे आपले घर आहे, तसेच हे जंगल या प्राणी, पक्षी इतर जीवांचे घर आहे आणि मी त्यांना वाचवत असतो,” असे दिनेश सांगतात. हे जंगल या मुक्या जीवांचे घर आहे. भले कोणी ते वाचवण्यासाठी येत नाही तरी चालेल. पण, मी माझे काम करणार, असा प्रण त्यांनी घेतला आहे.
मानवनिर्मित वणवा हा शक्यतो दुपारच्या उन्हामध्ये लावला जातो. याठिकाणी हवा खूप जोरात येते आणि वणवा खूप लवकर पसरतो. त्यानंतर दिनेश आणि त्याचे सहकारी ज्या बाजूने वणवा येत असतो, त्याच बाजूने समोर जाऊन तो विझवतात. आगीच्या समोरा समोर जाऊन वणवा विझवण्याचा प्रयत्न करतात. कारण, पाठीमागून गेल्यास तो विझत नाही. शिवाय धुरामध्ये सापडून गुदमरायलादेखील होते. चार ते पाच फुटांपर्यंत वाढलेले गवत जेव्हा पेट घेते, तेव्हा त्याची लाट पाच ते सहा फूट उंच जाते. तसेच, त्यातून निघणारी उष्णता खूप लांबवर जाणवत असते. दिनेश यांना तर आगीच्या जवळ जाऊन आग विझवावी लागते. अशावेळी खूप वेळा चटके बसतात. काही वेळा भाजून जखमही होते.
बर्याचदा वणवा लागल्यावर त्याठिकाणी अधिवास असणारे साप आणि वन्यप्राणी आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असतात. अशावेळी वणवा विझवणार्या दिनेश यांच्यावर कित्येकवेळा वन्यजीवांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एकदा वणवा विझवताना त्याठिकाणी लपलेले रानडुक्कर दिनेश यांच्या अंगावर धावून आले. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी दिनेश धावले आणि खड्ड्यांत अडखळून पडले. त्यावेळी आग त्यांच्या अंगावर आली. त्यांनी प्रसंगावधान राखून लागलीच आगीच्या लोटापासून आपला बचाव केला. काही वेळा गावापासून किंवा लोकवस्तीपासून कित्येक किलोमीटर लांब वणवा विझवत जावे लागते. सोबत आणलेले पाणी संपले की, कोणी पाणी देणारा तिथे नसतो. या भयानक आगी समोर उभे राहून शरीराचे तापमान खूप वाढलेले असते. खूप तहान लागलेली असते.
मात्र, अशा परिस्थितीतदेखील विझल्याशिवाय दिनेश जागेवरून हलत नाहीत. वणव्याच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या अनेक वन्यजीवांना दिनेश जीवदान देतात. जखमी पक्षी किंवा पिल्लांवर प्रथमोपचार करून त्यांना पुन्हा जंगलात सोडतात. जंगलात देव शोधणार्या दिनेश यांनी आजवर दोन हजारांहून अधिक वणवे विझवले आहेत. सध्या ते विधीशास्त्राचे शिक्षण घेत आहेत. ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या विचाराने चालणारे दिनेश, आपले हे काम निसर्ग संवर्धनामधील खारीचा वाटा असल्याचे सांगतात. निसर्गाला देव मानून त्यांच्या रक्षणासाठी कोणत्याही मोबादल्याचा विचार न करता झटणार्या दिनेश यांच्यासारख्या जंगलदूतांची आपल्याला आज गरज आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
अक्षय मांडवकर