मुंबई : ( MHADA to launch Affordable healthcare initiative ) म्हाडाच्या रहिवाशांसाठी मह्त्त्वाची माहिती समोर आली आहे. म्हाडाच्या ३४ वसाहतीमधील रहिवाशांना अवघ्या एक रुपयात वैद्यकीय उपचार मिळणार आहे. म्हाडाच्या ३४ वसाहतींमध्ये स्वस्त दरातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी म्हाडा मुंबई मंडळाने मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल या खासगी संस्थेच्या वन रुपी क्लिनिकसोबत सामंजस्य करार केला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ११४ अभिन्यासातील ३४ वसाहतींमध्ये 'आपला दवाखाना' ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत रक्त तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी यासारख्या सुविधा केवळ १० रुपयांमध्ये केल्या जाणार आहेत. म्हाडातर्फे वन रूपी क्लिनिक संस्थेला म्हाडा वसाहतीच्या आवारात ४०० चौरस फुटांची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सुरुवातीला म्हाडाच्या कुलाबा कफ परेड, चेंबूर, पंतनगर- घाटकोपर, कन्नमवार विक्रोळी, महावीर नगर - कांदिवली, प्रतिक्षा नगर, सायन, अंटोप हिल-वडाळा, आदर्श नगर-ओशिवरा, सांताक्रूझ, अंधेरी, वांद्रे, जुहू, कुर्ला, मानखुर्द, माहीम, कांदिवली, बोरीवली येथील म्हाडा वसाहतीत वन रुपये क्लिनिक उभारले जाणार आहेत.