टिंगल करणारा कलाकार विनोदी कलाकार असुच शकत नाही... कुणाल कामराच्या विरोधात अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंनी मांडली भूमिका!
03 Apr 2025 17:20:08
मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं आहे. मात्र, अद्याप त्याने हजेरी लावलेली नाही. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी स्टँडअप कॉमेडी आणि या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
स्टँडअप कॉमेडीबद्दल अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांचे मत
स्टँडअप कॉमेडी ही विनोदाचा एक स्वतंत्र शैली आहे. यामध्ये पंचेसना विशेष महत्त्व असतं, असं मत अशोक सराफ यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “स्टँडअप कॉमेडी ही निश्चितच प्रभावी असते, पण त्यात सादरीकरण आणि पंचेस यांना महत्त्व असतं. केवळ टिंगल करून हसवणं सोपं असतं, पण खरी विनोदनिर्मिती वेगळी असते.”
तर वंदना गुप्ते म्हणाल्या, “स्टँडअप कॉमेडी ही बहुतांश वेळा दुसऱ्यांची टिंगल करण्यातून उभी राहते. मात्र, स्वतःच्या शैलीतून लोकांना हसवणं हे अधिक प्रभावी ठरतं. विनोदाला लॉजिक असणं गरजेचं आहे, फक्त कुणाच्याही टिंगलवर तो आधारलेला असता कामा नये.”
\
कुणाल कामराच्या प्रकरणावर प्रतिक्रिया
कुणाल कामराने आपल्या कॉमेडीमध्ये राजकीय नेत्यांवर केलेल्या टीकेवरही या दोन्ही ज्येष्ठ कलाकारांनी मत व्यक्त केलं. अशोक सराफ म्हणाले, “टिंगल करून हसवणं हा एक मार्ग असू शकतो, पण त्याचबरोबर अस्सल कॉमेडी निर्माण करणंही महत्त्वाचं आहे. वंदना गुप्ते म्हणाल्या, “दुसऱ्यांची टिंगल करणं हा काही कलेचा आनंद नाही. स्वतःच्या शैलीतून हसवण्याचा प्रयत्न करावा.”
या प्रतिक्रियांमुळे स्टँडअप कॉमेडीबद्दल नवा चर्चासत्र रंगले असून, समाजातील विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.