मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत 'कलम ४०' चा गैरवापर; वक्फ बोर्डाचे धक्कादायक वास्तव उघडकीस!

03 Apr 2025 15:41:40

Waqf Board misuse of Section 40

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Waqf Board misuse of Section 40) 
लोकसभेत १२ तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक पास झाले. दरम्यान विधेयकाच्या बाजूने एकूण २८८ मते पडली, तर विरोधात २३२ मते पडली आहेत. वास्तविक हे विधेयक वक्फ मालमत्तेच्या पारदर्शकतेबाबत आहे, मात्र विरोधक याला धार्मिक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर वक्फ विधेयकात सुधारणा करणे आवश्यक होते. कारण त्यातील 'कलम ४०' त्याला कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्याची सूट देत होते. अशातून वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनीच नाही तर मंदिरे आणि चर्चवरही आपला दावा मांडला होता.

वक्फ बोर्डाने दिल्लीतील ६ प्रमुख मंदिरांवर दावा केला आहे. २०१९ च्या एका अहवालातून हे उघड झाले, ज्यात ही मंदिरे वक्फ जमिनीवर असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर तमिळनाडूतील तिरुचेंथुराई गावातील वक्फ बोर्डाने १५०० वर्षे जुन्या हिंदू मंदिरासह संपूर्ण गावावर दावा केल्याने वादाला तोंड फुटले आहे. उत्तर प्रदेशच्या लखनौमधील २५० वर्ष जुन्या शिवालय गोपेश्वर महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला होता. याशिवाय उत्तर प्रदेशातील इतरही अनेक मालमत्तांवर दावे असल्याची माहिती समोर आली आहे. बिहारच्या सोगरा वक्फ बोर्डाने मुझफ्फरपूरच्या गरीबनाथ मंदिराला दिलेल्या २७० चौरस फूट जमिनीवर दावा केला आहे, ज्याचे प्रकरण वक्फ न्यायाधिकरणात सुरू आहे.

केरळमधील परिस्थिती अत्यंत भीषण होती. वक्फ बोर्डाने एर्नाकुलम जिल्ह्यातील मुनंबम आणि चेराई भागातील ४०४ एकर जमिनीवर दावा केला आहे, जिथे ६०० हून अधिक कुटुंबे राहतात. यापैकी सुमारे ४०० ख्रिस्ती कुटुंबे आहेत. या परिसरात अनेक चर्च देखील आहेत आणि स्थानिक ख्रिश्चन समुदायाचा दावा आहे की चर्चसह त्यांच्या मालमत्तांवर वक्फ बोर्डाने बेकायदेशीरपणे दावा केला आहे. सायरो-मलबार चर्च आणि केरळ कॅथोलिक बिशप कौन्सिलने संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) हा मुद्दा उपस्थित केला आहे. किती चर्चवर थेट दावा करण्यात आला हे स्पष्ट नसले तरी वादात चर्चच्या मालमत्तेचाही समावेश आहे. ही काही मोजकी उदाहरणे आहेत, मात्र वक्फ बोर्डाने कलम ४० चा गैरवापर करत अशा कित्येक मालमत्ता गिळंकृत केल्या आहेत.


Powered By Sangraha 9.0