मुंबई : मुलुंड पश्चिम येथील एम.टी. अगरवाल रुग्णालयाचे खाजगीकरण तातडीने थांबवा, अशा मागणीचे पत्र नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना लिहिले आहे.
प्रकाश गंगाधरे आपल्या पत्रात म्हणाले की, "मुलुंड पश्चिम येथील मुंबई महानगरपालिकेच्या एम.टी. अगरवाल रुग्णालय पुनर्बाधणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून रुग्णालय इमारत लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. या रुग्णालयाच्या पुनर्बाधणीसाठी मी गेली ७ वर्षे पाठपुरावा करत आहे. तसेच या रुग्णालयाच्या कामासाठी मी लाक्षणिक उपोषण देखील केले होते. मात्र, सदर रुग्णालयाचे खाजगीकरण करण्यात येणार असल्याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे. तसेच याबाबत सर्व स्तरातून विरोध दर्शविला जात आहे."
हे वाचलंत का? - धक्कादायक! दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा; दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन महिलेचा मृत्यू
खासगीकरण केल्यास समस्या उद्भवणार
"महापालिकेने एवढा निधी खर्च करून रुग्णालयाची पुनर्बाधणी केली आणि आता ते सुरु करण्याची वेळ आली असताना खासगी संस्थेला चालवायला देणे अयोग्य आहे. सदर रुग्णालयाची पुनर्बाधणी करण्यापूर्वी रुग्णालयातील आय.सी.यु. युनिट जेव्हा खाजगी संस्थेला चालवायला दिले होते तेव्हा त्यातील सावळा गोंधळ महापालिका प्रशासनाने पाहिला होता. त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नसायचे, कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही नियमांचे पालन होत नसे आणि मनमर्जी कारभार चालत होता. गेल्या काही वर्षांपासून या रुग्णालयात विविध समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे रुग्णालयाचे खासगीकरण झाल्यास तेथे उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे," असेही ते म्हणाले.
"त्यामुळे सदर रुग्णालयाचे खासगीकरण तातडीने थांबवावे. मुलुंडकर जनता आणि रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा निर्माण करून देण्यासाठी रुग्णालयातील शेवटच्या टप्यातील उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून सदर रुग्णालयाचे लोकार्पण लवकरात लवकर करण्यात यावे. तसेच या रुग्णालयात नव्याने डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी," अशी मागणी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी आपल्या पत्रात केली आहे.