मुंबई : मी डॉक्टर नसलो तरी मोठी मोठी ऑपरेशन केली आहेत. कोणाचा मानेचा पट्टा, पाठीचा पट्टा, कमरेचा पट्टा सगळा निघून गेला, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण संकुलात माजी आरोग्यमंत्री आणि राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. दीपक सावंत यांना मिळालेल्या ‘पीएचडी’ पदवीबद्दल त्यांचा विशेष कौतुक सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
हे वाचलंत का? - उबाठा गटाला हिंदुत्वासोबतच हिंदूंचीही ॲलर्जी! भर सभागृहात खासदार श्रीकांत शिंदेंनी टोचले कान, म्हणाले...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "डॉ. दीपक सावंत यांनी आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले. एक दूरदृष्टी असलेले डॉक्टर आणि समाजसेवक शिवसेनेमध्ये आहेत याचा मला अभिमान आणि समाधान आहे. कोविड काळात सगळ्यांचाच कस लागला. ते अनपपेक्षित संकट होते. काय होणार याबद्दल कुणालाच काहीच माहिती नव्हते. सुरुवातील सगळ्यांनीच हलक्यात घेतले. तुम्हालाही काही लोकांनी हलक्यात घेतले, तसेच मलाही काही लोकांनी हलक्यात घेतले होते. पण मी डॉक्टरांचे काम जवळून पाहिले आहे. तसा मी जरी डॉक्टर नसलो तरी मोठी मोठी ऑपरेशन केली आहेत. कोणाचा मानेचा पट्टा, पाठीचा पट्टा, कमरेचा पट्टा सगळा निघून गेला," अशी टीका त्यांनी केली.