मुंबई : वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांची दुतोंडी भूमिका चव्हाट्यावर आली आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. तसेच त्यांनी हे क्रांतीकारी पाऊल उचलल्याबद्दल मोदी सरकारचे आभारही मानले.
आपल्या 'एक्स' अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या की, "लोकसभेत रात्री उशिरा ऐतिहासिक वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संमत झाले. गोरगरीब मुस्लिमांसाठी हे पाऊल आवश्यकच होते आणि आता हे क्रांतिकारक पाऊल पडले आहे. समाज सुधारण्यासाठी आणि नवक्रांतीकडे झेप घेण्यासाठी हे आवश्यक होते. या नव्या क्रांतिकारक निर्णयामुळे वक्फ बोर्डाच्या मनमानीला आणि अनियमिततेला मोठ्या प्रमाणावर चाप बसणार आहे. शिवाय, भ्रष्टाचारही रोखला जाणार आहे."
"देशातील विरोधी पक्षांनी या विधेयकाच्या अनुषंगाने बराच गदारोळ केला आणि संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला. परंतू, या निर्णयामुळे कोणत्याही समाजाचे कसलेही नुकसान होणार नाही. या उलट मुस्लिम समाजामध्ये शैक्षणिक आणि औद्योगिक पायाभरणी होणार आहे. या दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने विरोधकांचा खरा चेहरा विशेषतः, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांची दुतोंडी भूमिका चव्हाट्यावर आली आहे. देशाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक भरारी कोणी रोखू शकणार नाही. त्यासाठी हे वक्फ दुरुस्ती विधेयक अतिशय आवश्यक होते," असेही त्या म्हणाल्या.