ऑस्ट्रेलियामध्ये नुकतेच ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्राच्या अनेक शाखांना टाळे ठोकण्यात आले आहे. या केंद्रांच्या शाखा जगभरातल्या 160 देशांमध्ये आहेत आणि यामध्ये दहा दशलक्ष विद्यार्थी चिनी भाषा आणि संस्कृती शिकत आहेत. अशा या केंद्रांना बंद करण्याचे पाऊल ऑस्ट्रेलियाने का उचलले? ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्र नक्की काय आहे?
तर वरवर पाहता असे दिसते की, चीनचा प्रसिद्ध दार्शनिक कन्फ्यूशियस याच्या विचारदर्शनाचा प्रचार-प्रसार करणारे हे शैक्षणिक केंद्र आहे. चीनची सरकारी संस्था ‘हेनबेन’च्या अंतर्गत पहिल्यांदा 2004 साली हे केंद्र दक्षिण कोरियातील सिओला येथे सुरू झाले. ‘हेनबेन संस्था’ चीनच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत येते. मात्र, कालांतराने ‘हेनबेन’चे नामकरण ‘सेंटर फॉर लॅग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ असे केले गेले. याच नावाने एक स्वयंसेवी संस्थाही निर्माण करण्यात आली. ही संस्था ‘कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूट’साठी काम करते. या आधीही या इन्स्टिट्यूटच्या शाखांना जगभरातील अनेक देशांनी टाळे ठोकले.
2013 साली फ्रान्समध्ये या केंद्रावर बंदी आणली गेली, तर स्वीडन, कॅनडामध्येही हे केंद्र बंद केले गेले. तसेच, ट्रम्प यांच्या मागच्या कारकिर्दीमध्ये अमेरिकेतील 80 केंद्रे बंद केली गेली. चिनी भाषा शिकवण्याच्या मुखवट्या आड ‘कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूट’ ब्रिटनमध्ये हेरगिरी करत आहे, असे म्हणत, ब्रिटनमध्येही या केंद्राच्या शाखा बंद करण्यात आले. भारतातील विश्वविद्यालयांना ‘कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूट’ला सहभागी करायचे असेल, तर त्याआधी संस्थांनी विदेशी फंडिंगची पूर्ण माहिती सरकारला द्यायला हवी, ही प्रमुख अट आहे.
असो. अभ्यासकांच्या मते, चीनच्या कम्युनिस्ट विचारधारेला मानणार्या आणि चीनचे समर्थन करणार्या संस्थांसोबत चीनचे हे केंद्र काम करते. त्यानुसार, या संस्थांना शैक्षणिक वस्तू, शिक्षक आणि शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली चीन भरपूर आर्थिक मदत करतो. या केंद्रामध्ये चिनी भाषाच नव्हे, तर चिनी भाषा लिपी, चिनी खाद्यपदार्थ स्वयंपाक बनवणे, मार्शल आर्ट्स शिकवले जाते. मुख्य म्हणजे, या इन्स्टिट्यूटच्या जगभरातील विद्यार्थ्यांना चीनचा अभ्यास दौरा करायचा असेल, तर चीन त्याबाबत योग्य नियोजन करतो. याबाबत म्हटले जाते की, हे चीनच्या कम्युनिस्ट विचारधारेचे कट्टर समर्थक आणि स्वतःच्या मातृभूमीशी नाही, तर चीनशी बांधिलकी असणार्या तथाकथित विद्यार्थ्यांना चीनमध्ये पायघड्या घातल्या जातात. मागे ‘एबीसी’ या संस्थेने एका अहवालात स्पष्ट लिहिले होते की, या इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करणार्या शिक्षकांसाठी मुख्य अट आहे की, शिक्षक राजनीतिकदृष्ट्या समजदार असावा, म्हणजे शिक्षक कम्युनिस्ट पक्षाचा कट्टर समर्थक असावा. तसेच, शिक्षकाला चीनबद्दल पराकोटीचे प्रेम आणि आदर असावा. थोडक्यात, चीनच्या कम्युनिस्ट विचारांचा प्रचार जगभरात व्हावा, यासाठी या केंद्राचे प्रयोजन आहे. या केंद्राबाबत ऑस्ट्रेलिया इतकी सावध का आहे? तर यावर्षीच्या चिनी नव्या वर्षाला ऑस्ट्रेलियामधल्या सगळ्यात महागड्या वास्तू खरेदी करण्यामध्ये चिनी नागरिक हे पहिल्या क्रमांकावर होते. जून 2022 सालापर्यंत चीनमध्ये जन्मलेले जवळ जवळ सहा लाख लोक ऑस्ट्रेलियामध्ये राहात होते. एका दशकापूर्वीच्या तुलनेने चिनी लोकांची ही लोकसंख्या 47 टक्क्यांनी वाढली. देशात मोठ्या प्रमाणात चिनी लोक आहेत आणि ते ‘कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून चीनशी पुन्हा जोडले जातात. दुसरीकडे चीनही अभ्यास आणि सरावाच्या नावाखाली ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम तटावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ऑस्ट्रेलिया-चीन युद्ध झाले, तर ‘कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून चीनवर विशेष प्रेम, निष्ठा असलेले लोक कुणाचे समर्थन करतील? उत्तर आहे चीनचे, तर हा प्रश्न पडूच नये आणि चिनी समर्थक देशात निर्माण होऊ नये, म्हणून ऑस्ट्रेलियाने चीनच्या शैक्षणिक केंद्राच्या शाखाच बंद केल्या. आपल्या देशातही चीन आणि पाकिस्तान समर्थक निर्माण करण्याची केंद्रे आहेत का? याबद्दल विचार करायला हवा.
9594969638