मुंबई : मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता रूपेरी पडद्यावर झळकला आहे. ‘झापुक झुपूक’ या त्याच्या पदार्पणातील सिनेमाला नुकतीच प्रेक्षकांची भेट झाली आहे. केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित झाला असून, चार दिवसांतील कमाईची आकडेवारी समोर आली आहे.
सूरज चव्हाण ‘गुलीगत किंग’ म्हणून ओळखला जातो. त्याचा खास चाहता वर्ग असल्यामुळे ‘झापुक झुपूक’विषयी उत्सुकता अधिक होती. ‘बिग बॉस मराठी 5’च्या अंतिम पर्वात केदार शिंदे यांनी या सिनेमाची अधिकृत घोषणा केली होती, आणि तेव्हापासूनच या सिनेमाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
चार दिवसांत किती कमावलं ‘झापुक झुपूक’ने?
सिनेमाच्या कमाईबाबत सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 24 लाख रुपयांचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशीही हीच कामगिरी कायम राहिली. मात्र तिसऱ्या दिवशी कमाई 19 लाखांवर आली आणि चौथ्या दिवशी ती 14 लाखांवर स्थिरावली. एकूण मिळकत पाहता, ‘झापुक झुपूक’ने 4 दिवसांत 81 लाखांची कमाई केली आहे.
प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर
चित्रपटगृहात अधिकाधिक प्रेक्षकांची उपस्थिती वाढावी यासाठी खास योजना राबवण्यात आली आहे. 29 एप्रिल रोजी ‘झापुक झुपूक’ अवघ्या 99 रुपयांत पाहता येणार आहे. ही ऑफर सिनेमाच्या पाचव्या दिवशीच्या कलेक्शनवर सकारात्मक परिणाम करणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
कलाकारांचा बहारदार संच
या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. एक हटके प्रेमकथा मांडण्याचा प्रयत्न केदार शिंदे यांनी केला असून, त्यांच्या दिग्दर्शनाला प्रेक्षकांची प्रतिक्रिया कशी मिळते, हे येणाऱ्या आठवड्यांमध्ये स्पष्ट होईल.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.