तंत्रज्ञानाचे नेमके उद्दिष्ट काय?

    29-Apr-2025
Total Views |


तंत्रज्ञानाचे नेमके उद्दिष्ट काय?


मानवी आयुष्याला अधिक सुखी करण्यासाठी दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. मात्र, पाश्चात्य तंत्रज्ञान हे मानवी शरीराच्या श्रमपरिहाराचे लक्ष्य ठेवूनच निर्माण झाले असल्याने, ते मानवी शरीराचाच विचार करते, तर भारतीय संस्कृतीत सुखाच्या व्याख्येत पंचकोशीय शरीराचा विचार करण्यात आला आहे.


विज्ञान या विषयाची व्याप्ती नेमकी किती आणि त्यानुसार विज्ञानाच्या विषयवस्तूची व्याख्या नेमकी कशी करावी, यावरील भारतीय आणि पाश्चात्य चिंतनातील भेद आपण गेल्या काही लेखांमधून पाहात आहोत. भारतीय चक्रीय प्रतिमान आणि पाश्चात्य रेषीय प्रतिमान यातील भेदामुळे, विज्ञानाच्या आकलनावर आणि प्रगतीवर कसा प्रभाव पडतो, हेही आपण पाहिले. या विषयाच्या चर्चा करताना एक भेद नेहमी केला जातो तो म्हणजे, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील फरकाचा. आपण आतापर्यंत जी चर्चा केली आहे, ती सर्वसाधारण विज्ञानाच्या संदर्भात केली. परंतु, एकार्थी पाहिल्यास विज्ञान हे तसे ‘देशकालनिरपेक्ष’ असल्याने, त्यात संस्कृतीसापेक्ष संदर्भ कमी असतात. तंत्रज्ञान हे मुळातच उपयोजित स्वरूपाचे असल्याने ज्या काळात, ज्या प्रदेशात आणि ज्या समाजासाठी त्याचे उपयोजन करायचे, त्याच्याशी ते तंत्रज्ञान अनुसरून असणे आवश्यक आहे. त्यामुळे निर्वसाहतीकरणाच्या संदर्भात तंत्रज्ञानाचा विचार करताना, दोन प्रमुख विषय समोर येतात. पहिला म्हणजे सांप्रतकालीन भारतीय समाजासाठी योग्य असे तंत्रज्ञान आणि त्याच्या विकासाची नेमकी दिशा कोणती. दुसरा विषय म्हणजे, तंत्रज्ञानाच्या जागतिक पातळीवरील प्रगतीच्या दिशेविषयी, भारतीय चिंतन आणि दृष्टिकोन काय भूमिका घेते आणि या दृष्टिकोनाचे जागतिक पातळीवरील लाभ कोणते?

तंत्रज्ञान याचा सर्वसाधारण अर्थ, उपयोजित विज्ञान असा घेता येतो. म्हणजे विविध मानवी व्यवहारांत सहजता आणण्यासाठी, ज्या विज्ञानाधारित तत्त्वांचा वापर करून विविध उपकरणे, यंत्रे किंवा साधने बनवली जातात, त्या सर्वांविषयीच्या ज्ञानास तंत्रज्ञान असे म्हटले जाते. यात मानवी शारीरिक श्रम कमी होणे आणि पुनरावर्ती स्वरूपाची कामे करावी न लागणे हा एक भाग जसा आहे, तसाच एका माणसाच्या किंवा छोट्या मानवी गटाच्या स्नायूशक्तीच्या आवाक्याबाहेरील कामे, यंत्रांद्वारे करवून घेणे हा दुसरा भाग आहे. पहिल्या प्रकारात चिमटा, स्क्रू-ड्रायव्हर, नोटामोजणी यंत्र, संगणक इत्यादींचा अंतर्भाव होईल, तर दुसर्‍या प्रकारात कारखान्यातील संयंत्रे, इंधनचलित वाहने, आकाशातील उपग्रह, मोठमोठी धरणे यांचा समावेश होईल. परंतु, हे दोन्ही प्रकार पाहिले तर त्यांच्यात एक सामायिक बाब असेल, ती म्हणजे मानवी श्रम कमी करून, त्याला सुखोपभोगाची अधिकाधिक साधने उपलब्ध करून देणे. तेव्हा हेच तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट आहे, असा प्राथमिक समज सहजगत्या आपला होतो.


थोडक्यात म्हणजे तंत्रज्ञानाची व्याख्या ही मानवी सुखाशी संबंधित आहे. आपण मागील लेखांमध्ये पाहिले की, पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि विज्ञान हे मूलतः मानवकेंद्रित आहे. त्यामुळे हे स्वाभाविकच आहे की, त्या चिंतनातून उगम पावलेले तंत्रज्ञान, हे मानवी सुखोपभोगांना केंद्रात ठेवून रचलेले असणार. त्यामुळे पाश्चात्य चिंतनावर आधारित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातून वैचारिक वसाहतवादाचे निर्मूलन करायचे असल्यास, या दोन विषयांवर हिंदू चिंतन काय आहे, त्याचा मुळातून विचार होणे आवश्यक आहे. पहिले तंत्रज्ञानाची मानवकेंद्रितता असावी का आणि दुसरे म्हणजे मानवी सुख कशात असते? यापैकी तंत्रज्ञानाची मानवकेंद्रितता सहज ध्यानात येणारी आहे. याचे स्वाभाविक कारण म्हणजे, नैसर्गिक स्थितीत न राहता एका सांस्कृतिक समाजाची निर्मिती ही मानवाची एक स्वाभाविक प्रेरणा आहे, असे एकंदरीत मानवी इतिहासावरून म्हणता येईल. त्यामुळे प्राचीन काळापासून दगडांची हत्यारे तयार करणे, यासारखे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा भाग राहिले आहे. आगीचा शोध, शेतीचा शोध आणि चाकाचा शोध हे मानवी विकासातील महत्त्वाचे टप्पे मानले जातात, जे एका दृष्टीने तंत्रज्ञानात्मकच आहेत. या शोधांचा, मानवाव्यतिरिक्त सजीव सृष्टीतील कोणत्याही प्राण्यास लाभ झालेला नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या अति मानवकेंद्रिततेमुळे काही जागतिक दोष उत्पन्न होत असले, तरी तंत्रज्ञानाची व्याख्याच मुळातून बदलावी असे इथे नाही.


मानवकेंद्रितता ही जरी तंत्रज्ञानाच्या आकलनातून टाळण्यासाठी नसली, तरी मानवी सुख नेमके कशात आहे याचा मात्र पुनर्विचार होणे आवश्यक आहे. पाश्चात्य संकल्पनेतील मानवी अस्तित्व हे मुळात शरीर असल्याने, त्यांची सुखाची कल्पनाही शरीराशी निगडीत आहे. किंबहुना सुखाचा ध्यास आणि सुख मिळवण्याचा सतत प्रयत्न करण्याची प्रेरणा ही स्वाभाविक असून, तीच नीतीमत्तेचे मूळ कारण असल्याचे पाश्चात्य जगात मानले गेले. तंत्रज्ञानाच्या वापरातून मिळणार्‍या सुखाचे नेमके अधिकारी कोण? याविषयी जरी मतमतांतरे असली, तरी त्या त्या मतानुसार जो तंत्रज्ञानाचा उपभोक्ता वर्ग होता, त्याच्या सुखोपभोगांचे उच्चतमीकरण हा तंत्रज्ञानाचा एकमेव ध्यास होऊन बसला. यात समाजातील अन्य घटकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत आहे का, अथवा सृष्टीची भरून न येणारी हानी होत आहे का? असे कोणतेही विचार ध्यानात घेतले गेले नाहीत. पाश्चात्य देशात फॅशन म्हणून वापरल्या जाणार्‍या चामड्याच्या वस्तू, हे याचेच एक उदाहरण आहे. अत्यंत महाग ब्रॅण्डच्या या वस्तू जिथे बनतात, ते लोक त्या वापरू शकत नाहीत. चर्मोद्योगातून प्रचंड प्रदूषण होते; परंतु ते युरोप-अमेरिकेत होत नसल्याने, या उत्पादनांच्या उपभोक्त्यांना या सर्व व्यवहारांच्या पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव नेमकी होत नाही. किंबहुना प्रचलित अर्थशास्त्रीय सिद्धांतांनुसार, या जबाबदारीचे मूल्य या उत्पादनांच्या किमतीत अंतर्भूतच असते, असे मानले जाते.


सुखाचा भारतीय विचार हा मुळात केवळ शरीर सुखाशी निगडीत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाची निर्मिती ही जरी मानवी सुखासाठी असली, तरी ती केवळ शरीर सुखासाठी आहे, असे भारतीय विचार मान्य करत नाही. योगशास्त्रात वर्णन केलेली पंचकोशीय शरीर संकल्पना, इथे उपयुक्त ठरते. पाश्चात्य दृष्टीचा विचार केल्यास, तिथे केवळ अन्नमय कोश आणि प्राणमय कोश इथपर्यंतच सुखाचा विचार मर्यादित आहे. परंतु, त्यापलीकडे जाऊन मनोमय कोश जो या सर्व सुखांच्या अनुभूतींचे स्थान आहे, त्याचा विचार पाश्चात्य जगात आताच कुठे सुरू झाला आहे. ध्यानाचे विविध प्रकार आणि पद्धती यांचा विचार आणि तंत्रज्ञानामार्फत मनोमय कोशासही सुख मिळवून देण्याचा विचार, आता विविध अ‍ॅप्सद्वारे होत आहे. परंतु, मुळात या सर्व कोशांची सुखप्राप्ती कशात आहे हे जाणण्यासाठी, त्या कोशांच्या विषयवस्तू काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. तेव्हा हे लक्षात येईल की, ‘सर्वेपि सुखिनः सन्तु’ हे झाल्याशिवाय, विज्ञानमय कोश जो चराचराशी एकत्व जाणतो तो सुखी होऊ शकत नाही आणि आपल्याच आतील आनंदमय कोशाची अनुभूती झाल्यास, भौतिक सुखांमागे धावण्याची गरजच संपते.


शरीर सुखांचा भारतीय तत्त्वज्ञानाच्या संदर्भात अधिक विचार केल्यास असेही लक्षात येते की, केवळ शरीरसुखाचा विचार हा पाशवी सुखाचा ठरतो. आपल्याकडे ‘न जातु काम: कामानामुपभोगेन शाम्यति’ हे तत्त्व नेहमी सांगितले जाते. जशी अग्नीत तुपाची धार सोडल्यास तो अधिकच भडकून उठतो, तसेच अधिकाधिक उपभोगांनी भोगविषयाचे शमन होत नाही. त्यामुळे अधिक उत्पादन, अधिक भोग, अधिक सुख ही जी पाश्चात्य धारणा आहे, ती मुळातूनच चुकीची आहे. अशा प्रकारे इंद्रियविषयांच्या मागे धावून, त्यांचे केवळ तत्कालिक शमन होते. पण, पुढील वेळी ती अधिक उफाळून वर येतात आणि अधिक सुखाची मागणी करतात. एक प्रकारे अमली पदार्थांच्या सेवनाशी आपण या व्यवहाराचे साम्य पाहू शकतो. आता तर परिस्थिती अशीही घडते की, आधी नवीन तंत्रज्ञान निर्माण होते आणि मग त्याच्या उपभोगाची चटक लागावी म्हणून, विशेष प्रयत्न जाहिरातबाजी करून केले जातात. जगातील सर्व मुलांनी कॉर्नफ्लेक्स खावेत म्हणून अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, त्याची साठवण आणि वाहतूक तंत्रज्ञान, त्यातील पोषणमूल्य वाढवण्याचे तंत्रज्ञान, त्याची जाहिरात बनवणे आणि प्रसारित करणे यासाठीची तंत्रज्ञाने आणि अधिकाधिक कार्यक्षमतेने त्याची विक्री होण्यासाठीची तंत्रज्ञाने, या सर्वांचा विकास होतो. या एका मुळात, कोणाचीही इच्छा नसलेल्या उपभोगासाठी अन्नप्रक्रिया, वाहने आणि वाहतूक यांसारख्या पारंपरिक तंत्रज्ञानापासून, जैवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता इथंपर्यंत सर्वांचा वापर कुठे ना कुठे होतो.


वाढत्या जागतिकीकरणामुळे, तंत्रज्ञान आज संपूर्ण जगाला एका ठिकाणी आणते. त्याचा एक दुष्परिणाम असाही होतो की ,प्रगत जग विविध तंत्रज्ञानाचा वापर करून अमर्याद उपभोग तर घेते; पण त्याची जबाबदारी अन्य देशांवर सोपवते. आज जितकी दरडोई वीज युरोप वापरतो, तितक्या विजेचा वापर जर भारताने दरडोई सुरू केला, तर संपूर्ण जगाचे ऊर्जेचे गणितच कोलमडेल. याचे उत्तर म्हणून, विकसित राष्ट्रे ‘कार्बन क्रेडिट’ यासारख्या संकल्पना आणतात. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये छोटेमोठे गुन्हे अंगावर घेऊन, काही काळ तुरुंगात जाणारी आणि अशा प्रकारे टोळीच्या मुख्य भाईला वाचवणारी माणसे पूर्वी असत. ‘कार्बन क्रेडिट’ ही संकल्पना, यापेक्षा तत्त्वतः फारशी वेगळी नाही. तंत्रज्ञानातून केवळ समस्यांचे स्थानांतरण अपेक्षित आहे की, संपूर्ण मानवजातीस आणि पर्यायाने समग्र सृष्टीस समानतेच्या पातळीवर काही सुखोपभोग मिळावेत, अशी अपेक्षा आहे याचा विचार आज आवश्यक आहे. किंबहुना तंत्रज्ञानातील प्रगतीच्या आधारे हा जो प्रगत, विकसनशील आणि अप्रगत राष्ट्रे असा भेद केला जातो, तो एका नवीन वसाहतवादाचा मूलक आहे.


या सर्व विषयांचे सार पाहता, तंत्रज्ञानाची एकूणच आवश्यकता आणि त्याच्या प्रगतीची दिशा याचा पुनर्विचार मुळातून आवश्यक आहे. अमर्याद उपभोग किंवा सामान्यपणे कल्पनाही न केलेले उपभोग तंत्रज्ञानाद्वारे काहींना उपलब्ध होत आहेत, म्हणून घेत राहायचे. माझ्यासमोर मिठाईचे ताट आहे तर ओरपत राहायचे, मला मधुमेह जडतो आहे आणि बाजूचा उपाशी राहतो आहे या दोन्हींची चिंता मनाला शिवू द्यायची नाही, ही दिशा योग्य वाटत नाही. पंचकोशीय शरीरसंकल्पना, तंत्रज्ञानाच्या भारतीय आकलनासाठी पायाभूत तत्त्वज्ञान पुरवू शकते. परंतु, त्यासाठीची नेमकी दिशा काय असावी, याची सखोल चर्चा घडवून एक नवे प्रतिमान बनवणे ही आजची गरज आहे.



(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)

डॉ. हर्षल भडकमकर
9769923973