मुंबई पोलीस आयुक्तालयावर आज ‘विश्व हिंदू परिषदे’चा मोर्चा

- चोर सोडून, संन्याशाला फाशी; मोहन सालेकर यांचा आरोप

    29-Apr-2025
Total Views | 7

Vishwa Hindu Parishad morcha on Mumbai Police Commissionerate today
 
मुंबई: ( Vishwa Hindu Parishad morcha on Mumbai Police Commissionerate today ) हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून आकस भावनेने होणार्‍या कारवाईच्या निषेधार्थ ‘विश्व हिंदू परिषदे’चा मोर्चा मंगळवार, दि. 29 एप्रिल रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडकणार आहे. दुपारी 3 वाजता चर्चगेट रेल्वे स्थानक ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ येथे सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ‘विश्व हिंदू परिषद’ कोकण प्रांताचे प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी दिली.
 
“चोर सोडून, संन्याशाला फाशी’ असा मुंबई पोलिसांचा व्यवहार आहे,” असे सांगत मोहन सालेकर पुढे म्हणाले की, “गेल्या काही महिन्यांपासून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आकस व द्वेषापोटी पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत असल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. गोहत्या, ‘लव्ह जिहाद’च्या कित्येक प्रकरणांत गुन्हेगारांवर कारवाई करायचे सोडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनाच लक्ष केले जात आहे. ”
 
कुरार पोलीस ठाण्याच्या डीसीपी स्मिता पाटील यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडण्याची भाषा केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. “दि. 16 फेब्रुवारी रोजी सांताक्रूझमधील वाकोला परिसरात काही जिहाद्यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्या विनयभंग झालेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी गेलेल्या ‘बजरंग दला’च्या कार्यकर्त्यांनाच अमानुष मारहाण झाली,” असे सालेकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला ‘विहिंप’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर, ‘बजरंग दल’ कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरिया उपस्थित होते.
 
‘विहिंप’ आणि ‘बजरंग दला’चे कार्यकर्ते जाणीवपूर्वक ‘टार्गेट’वर
 
“वडाळा संगमनगर भागात श्रीराम नवमीनिमित्त निघणार्‍या शोभायात्रेच्या दोन दिवस अगोदर पोलिसांनी हिंदूविरोधी भूमिका घेत तयारीसाठी लावलेले सर्व बॅनर्स, भगव्या पताका काढून टाकल्या आणि सहभागी संस्थांना धमकावून भाग न घेण्याबाबत तंबी दिली. अ‍ॅन्टॉप हिल येथे बेअर हाऊसिंग बिल्डिंग कम्पाऊंड येथे शोभायात्रेसाठी तयार केलेले साहित्य पोलिसांनी हिसकावून घेतले. कार्यकत्यांनी याला शांततेने विरोध करताच, त्यांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केला.
 
त्यात एका कार्यकर्त्याचे डोके फुटले; काहींच्या हाताला, बोटांना जखमा झाल्या. रामचंद्र यादव यांना तर एवढी मारहाण झाली की, त्यांना के. ई. एम. रुग्णालयामधील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. ‘विश्व हिंदू परिषद’ सातत्याने शासन प्रशासनाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करीत आहे. तरीही, ‘विहिंप’ आणि ‘बजरंग दल’ कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक ‘टार्गेट’ केले जात आहे. त्यामुळे पोलिसांना अल्टिमेटम म्हणून त्यांच्या अशा कारवाईविरोधात हा मोर्चा आहे,” असे मोहन सालेकर यांनी सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121