लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
29-Apr-2025
Total Views | 9
पुणे : लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना करा, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. लोणावळा येथील महावितरण विश्रामगृह येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत गाडे, नायब तहसीलदार अमोल पाटील, शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरण सोनावणे, नगर पालिका प्रशासन अधिकारी संतोष खाडे, पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंडे आदी उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "लोणावळा परिसरात थंड हवेची ठिकाणे, कार्ला लेणी, एकविरा देवीचे मंदीर असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या परिसरात अपघात, श्वानदंश, सर्पदंश, मधमाशी आणि वटवाघूळाचे हल्ले, अंमली पदार्थ तसेच दारुचा पुरवठा इत्यादी बाबी समोर येत आहेत. त्यामुळे प्रथमोपचार, पोलीस मदत, स्वच्छता, प्रदूषण तसेच पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसोबतच अवैध गुटखा आणि अंमली पदार्थ वाहतूक विक्री करणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी."
"एकविरा देवीच्या यात्रेवेळी मधमाशा निर्मूलन मोहीम राबवावी. पर्यटकांना त्रास होऊ नये यासाठी मधमाशांपासून बचाव करण्यासाठी संरक्षणात्मक मार्गदर्शिका तयार कराव्या. तसेच या उपाययोजनांची जनजागृती करण्यात यावी. यासोबतच आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधे उपलब्ध राहतील, याबाबत दक्षता घ्यावी," अशा सूचना त्यांनी दिल्या.
पर्यटकांसाठी हेल्पलाईन सुविधा
"लोणावळा पोलिसांनी पर्यटकांच्या मदतीच्या दृष्टीने शहरी भागासाठी ९८५०११२४०० आणि ग्रामीण भागासाठी ९१४६०३२९७१ असे हेल्पलाईन क्रमांक सुरु केले आहेत. पर्यटकांनी या क्रमांकाचा लाभ घ्यावा. तसेच लोणावळा नगर परिषदेने शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे," असे आवाहनur डॉ. नीलम गोन्हे यांनी केले आहे.